पुरामुळे ४ लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 07:00 AM2019-08-22T07:00:00+5:302019-08-22T07:00:02+5:30

अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील तब्बल ४ लाख ९ हजार ५१६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. 

Damage to the agricultural land of 4 lakh hectares due to floods | पुरामुळे ४ लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान

पुरामुळे ४ लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देओल्या-कोरड्या दुष्काळाचा दुहेरी फटका : भात, मूग, उडिद पिकाचे क्षेत्र घटले

पुणे : राज्य ओल्या आणि कोरड्या दुष्काळाला सामोरे जात असल्याने शेतीला दुहेरी फटका बसत आहे. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील तब्बल ४ लाख ९ हजार ५१६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, मराठवाड्यात कमी पावसामुळे मूग आणि उडिद पिकाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. 
राज्यात ऊस पिक वगळून खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र १४०.६९ लाख हेक्टर असून, १३४ लाख हेक्टर (९५ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ऊस पिकासह सरासरी क्षेत्र १४९.७४ लाख हेक्टर असून, त्या पैकी १३५.०५ लाख हेक्टरवर पेरणीची कामे झाली आहेत. राज्यात १ जून ते १६ ऑगस्ट या कालावधीत सरासरी ७८२.४० मिलिमीटर पाऊस होतो. यंदा ८२८.४० मिलिमीटर पाऊस झाला आहे. सरासरीच्या १०५.८८ टक्के पाऊस झाला असला तरी राज्यात पावसाची विषमता आहे. पश्चिम महाराष्ट्रात ओला दुष्काळ असून, मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आणि मराठवाड्यात कमी पर्जन्यमानामुळे पिकांना नुकसान होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. 
कोकणात अतिवृष्टीमुळे भात, नाचणी, वरई, भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोल्हापूर विभागात सोयाबीन, भात, मूग, उडिद, मका, बाजरी, ऊस खरीप ज्वारी, भुईमूग, केळी, हळद, घेवडा ही पिके पुरामुळे बाधित झाली आहेत. 
मराठवाड्यातील औरंगाबाद विभागात बीड जिल्ह्यामधे कमी पर्जन्यमानामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे. लातुर विभागात तूर, मका आणि ज्वारी पिके वाढीच्या अवस्थेत असून, येथे पर्जन्यमानाची आवश्यकता असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. अमरावती विभागातही कमी पर्जन्यमानामुळे मूग आणि उडीदाच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागपूर विभागात तुरळक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे भात, कापूस, तूर, सोयाबीन ही पिके बाधित झाली आहेत. 
 मॉन्सूनच्या सुरुवातीला आणि जुलै महिन्यातील दोन आठवडे पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे भाताच्या क्षेत्रात यंदा सरासरीपेक्षा २४ टक्क्यांनी घट झाली आहे. ज्वारी, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, कारळे आणि सूर्यफुलाचे क्षेत्रही घटले आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र साडेपस्तीस लाख हेक्टर असून, त्यात ३९.३१ लाख हेक्टरपर्यंत वाढ झाली आहे. कापसाचे सरासरी क्षेत्र ४१.९१ लाख हेक्टर असून, त्यातही ४३.६३ लाख हेक्टर पर्यंत वाढ झाली. 

Web Title: Damage to the agricultural land of 4 lakh hectares due to floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.