Sanjay Raut vs Navnath Ban, Maharashtra Politics: संजय राऊत हे अधिकृतपणे उबाठा गटाचे प्रवक्ते म्हणून भाजपावर उठसूठ बिनबुडाची टीका करत असतात. मात्र त्यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यांमुळे ते शरद पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत की काँग्रेस आणि डाव्या आघाडीचे प्रवक्ते आहेत, हा प्रश्न उपस्थित होतो. या प्रश्नाचे उत्तर राऊतांनी द्यावे, असे आव्हान भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नगरसेवक नवनाथ बन यांनी दिले. संजय राऊतांचे दोन पाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीत, हात काँग्रेसमध्ये आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
"राऊत उबाठा गटाचे खासदार, प्रवक्ते म्हणून मिरवतात. मात्र प्रत्यक्षात ते राजकीय भूमिका शरद पवारांच्या हिताची घेतात, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. उबाठा गटाचे प्रवक्ते असताना प्रत्येक पक्षाच्या कारभारात नाक खुपसायचे काम राऊतांनी तात्काळ बंद करावे असे स्पष्ट शब्दांत सुनावून श्री. बन म्हणाले की प्रफुल्ल पटेल यांचे पाय कुठे आहेत हे बघण्याच्या भानगडीत राऊतांनी पडू नये. अजितदादा यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल महाराष्ट्राला पटेल अशी समतोल भूमिका घेत आहेत. राऊतांचे दोन पाय शरद पवार राष्ट्रवादीमध्ये, हात काँग्रेसमध्ये आहेत अशा स्थितीत उबाठा गटामध्ये राऊतांचे डोके तरी आहे का? की डाव्या आघाडीकडे डोके गहाण ठेवले आहे?" असा बोचरा सवाल बन यांनी विचारला.
"शरद पवारांचे दलाल आणि मुखिया म्हणून राऊतांची नियुक्ती झाली आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर संगमा, तारीक अन्वर, अरुण गुजराती यांनी पक्षहितासाठी प्रामाणिकपणे काम केले. आज अचानक ‘पटेल’ या नावावर आक्षेप घेत राऊत राजकारण करत आहेत. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाचा ताबा मिळवण्यासाठी काही डोमकावळे टपून बसले आहेत. त्या डोमकावळ्यांपैकी एक राऊत आहेत. अशा डोम कावळ्यांपासून राष्ट्रवादी पक्षाने सावध राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील, दोन्ही कुटुंबे एकत्र येणार असतील, तर भाजपाचा त्याला विरोध नाही," असे ते म्हणाले.
"राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करायचे की नाही, हा निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घ्यायचा आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा आहेत. त्या जो काही निर्णय घेतील, त्या निर्णयाला भाजपाचा पूर्ण पाठिंबा असेल. परंतु त्याआधी अजितदादांचे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत नेमके मत काय होते, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केले आहे की अजितदादांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत त्यांच्यासोबत कोणतीही चर्चा केली नव्हती. महाराष्ट्रातील जनतेने उबाठा गटाला महापालिका निवडणुकीत खरी जागा दाखवून दिली आहे. राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये उबाठा गटाला एकही जागा मिळालेली नसून, पक्षाचे संघटन देखील अस्तित्वात राहिलेले नाही. तसेच कर्जत-जामखेडमध्ये जनतेने रोहित पवारांना नाकारले होते. निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वापर केला नसता, तर त्यांचा पराभव निश्चित होता," असा दावा त्यांनी केला.
"भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचे नेतृत्व सक्षम आणि दूरदृष्टीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज जगभरात भारताचा सन्मान वाढत असून, अमेरिकेसारखा सामर्थ्यशाली देश पुन्हा एकदा भारतासोबत आला आहे. ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाचा तो विजय आहे. मात्र राऊत जाणीवपूर्वक राहुल गांधींची भाषा वापरत जागतिक पातळीवर भारताचा आणि देशाच्या नेतृत्वाचा अपमान करून देशाच्या प्रतिमेला धक्का देण्याचे काम करत आहेत, असा आरोप श्री. बन यांनी केला. देशाची बदनामी करणाऱ्यांना जनता कधीही माफ करत नाही हे राऊतांनी लक्षात ठेवावे," असेही बन यांनी नमूद केले.
Web Summary : BJP's Navnath Ban accuses Sanjay Raut of favoring Pawar's NCP and Congress while supposedly representing the Thackeray group. Ban questioned Raut's motives and criticized his interference in other parties' affairs, suggesting Raut is undermining India's global image.
Web Summary : भाजपा के नवनाथ बन ने संजय राउत पर ठाकरे समूह का प्रतिनिधित्व करते हुए भी पवार की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और कांग्रेस का पक्ष लेने का आरोप लगाया। बन ने राउत के इरादों पर सवाल उठाया और अन्य दलों के मामलों में उनकी दखलंदाजी की आलोचना की, साथ ही भारत की वैश्विक छवि को नुकसान पहुंचाने का आरोप लगाया।