लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणाचा भांडाफोड कसा झाला, याबाबत धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या प्रकरणातील व्हिसलब्लोअर शशिकांत सुतार यांनी परीक्षेनंतर प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि एका पीडीएफमधील प्रश्न जुळत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतरच संपूर्ण घोटाळा उघडकीस आल्याचे सांगितले.
सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मे रोजी नीट परीक्षा झाल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका सोडवण्याचे काम सुरू केले होते. त्यानंतर त्यांच्या ओळखीतील एका व्यक्तीने त्यांना केमिस्ट्री विषयातील काही प्रश्न असलेली पीडीएफ दाखवली. या पीडीएफमधील ४५ प्रश्न त्यांनी नीट-यूजीच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी पडताळून पाहिले असता सर्व प्रश्न तंतोतंत जुळत असल्याने ते हादरले.
यानंतर त्यांनी आणखी एका शिक्षकाकडून बायोलॉजी विषयातील ९० प्रश्नांची पडताळणी करून घेतली. हे प्रश्नही नीट परीक्षेतील प्रश्नांशी जुळत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी तातडीने नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे (एनटीए) संपूर्ण माहिती आणि पुरावे सादर केले. या तक्रारीनंतर एनटीएने तत्काळ हालचाल करत तपास यंत्रणांना माहिती दिली. त्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि विशेष तपास पथक यांनाही तपासात सहभागी करण्यात आले. या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली असून, पेपरफुटी रॅकेटची व्याप्ती किती मोठी आहे, याबाबत तपास यंत्रणा सखोल चौकशी करीत आहेत.
दरम्यान, २१ जून रोजी होणाऱ्या पुनर्रपरीक्षेच्या दिवशी पंजाबमधील सर्व उमेदवारांना सरकारी बसमधून मोफत प्रवास करण्याची सुविधा मिळावी, अशी विनंती आपण मुख्यमंत्री भगवंत मान यांना करणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी जाहीर केले.
सराव प्रश्नपत्रिकांची पडताळणी सुरू
सीबीआयचे पथक आरसीसी क्लासवर सलग तिसऱ्या दिवशीही तपासणी करीत असून, सराव प्रश्नपत्रिका आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी भाजपने काँग्रेस भवनासमोर तर मनसेने अनोख्या पद्धतीने आरसीसी कार्यालयासमोर आंदोलन करीत नीट प्रकरणाकडे लक्ष वेधले. क्लासेसवर सीबीआय पथकातील अधिकारी पेपरफुटीचे पुढचे धागेदोरे शोधत असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच शिवराज मोटेगावकर व क्लासेसमधून मिळणाऱ्या जबाबांची पडताळणी सुरू आहे.
सीबीआय कोठडीत चौकशी सुरू
शिवराज मोटेगावकर पुण्याच्या सीबीआय कोठडीत असून, तिथे चौकशी सुरू आहे. न्यायालयाने ९ दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर दिल्ली येथून पुण्यात आणण्यात आले आहे. चौकशीत जसजशी माहिती पुढे येईल तसे सीबीआय पथकाची शोधमोहीम त्या दिशेने होईल. तूर्तास लातुरातील क्लासेस कार्यालयातच तपासणी सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष किरण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आरसीसी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
नीट पुनर्परीक्षा सुरक्षित, त्रुटीमुक्त पद्धतीने घ्या; धर्मेंद्र प्रधान यांचे आदेश
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी आगामी नीट-यूजी पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला आणि परीक्षा सुरक्षित, सुरळीत आणि त्रुटीमुक्त पद्धतीने पार पाडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. ते म्हणाले की, यापूर्वीच्या परीक्षेतील त्रुटी पूर्णपणे दूर करणे आवश्यक आहे, जेणेकरून परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता जपली जाईल.
नीट-यूजी पुनर्परीक्षा अत्यंत कडक सुरक्षा नियम लागू करून नीट पार पाडावी असे प्रधान यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. ३ मे रोजी झालेली नीट परीक्षा राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) रद्द केली होती. आता पुनर्परीक्षा २१ जून रोजी घेण्यात येणार आहे. पुढील वर्षापासून वैद्यकीय प्रवेश परीक्षा संगणकाधारित (सीबीटी) पद्धतीने घेण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत, जेणेकरून परीक्षेशी संबंधित गैरप्रकार टाळता येतील.
नीट-यूजी परीक्षेच्या व्यवस्थेबाबत राज्यांतील जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांसोबत समन्वय बैठक घेण्याचे आदेश केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेश प्रधान यांनी दिले. परीक्षा केंद्रांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही परिस्थितीत तडजोड करण्यात येऊ नये तसेच विद्यार्थ्यांसाठी वाहतूक, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे आदेश प्रधान यांनी अधिकाऱ्यांना दिले.