Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 11:52 IST

संपाचे कारण काय? औषध विक्रेत्यांचा नेमका कशाला विरोध? जाणून घ्या...

औषधांची ऑनलाईन विक्री (E-Pharmacy) आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून मिळणारे मोठे आव्हान, याच्या निषेधार्थ आज(२० मे) रोजी देशभरातील १५ लाखांहून अधिक औषध विक्रेते (केमिस्ट आणि ड्रगिस्ट) आपली दुकाने बंद ठेवणार आहेत. 'ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स' (AIOCD) या संघटनेने या देशव्यापी संपाची हाक दिली आहे.

ठाणे येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना AIOCD चे अध्यक्ष आणि माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. कोविड-१९ महामारीच्या काळात सरकारने ऑनलाईन औषध पुरवठ्याबाबत जारी केलेल्या तात्पुरत्या अधिसूचना अजूनही मागे घेतलेल्या नाहीत. याच सवलतींचा गैरवापर करून ऑनलाईन औषध विक्रीचे मोठे जाळे पसरले असून, त्याच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

जगन्नाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, या संपादरम्यान सामान्य नागरिकांना आणि रुग्णांना त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाईल. रुग्णालयांना जोडलेली औषध दुकाने संपाच्या काळातही सुरू राहतील. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत औषध सेवा खंडित होऊ दिली जाणार नाही.

बोगस आणि प्रतिबंधित औषधांची उघड विक्री

पत्रकार परिषदेत ऑनलाईन औषध विक्रीच्या दुष्परिणामांवर गंभीर बोट ठेवण्यात आले. AIOCD च्या मते, ऑनलाईन विक्रीमुळे बाजारात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय बोगस औषधे, प्रतिजैविके आणि प्रतिबंधित अंमली पदार्थांची उघडपणे विक्री होत आहे. हा प्रकार सार्वजनिक आरोग्यासाठी, विशेषतः देशातील तरुण पिढीसाठी अत्यंत घातक ठरत आहे. ऑनलाईन कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अवाजवी सवलतींमुळे देशातील छोटे आणि किरकोळ औषध विक्रेते देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे.

२० ते ५० टक्क्यांची भरघोस सूट

कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना थेट घरापर्यंत औषधे मिळावीत म्हणून केंद्र सरकारने विशेष सवलती दिल्या होत्या. मात्र, महामारी संपून अनेक वर्षे झाली तरीही ते नियम अद्याप लागू आहेत, याकडे जगन्नाथ शिंदे यांनी सरकारचे लक्ष वेधले. या ढिसाळ नियमांचा फायदा घेऊन बड्या ऑनलाईन कंपन्या २० ते ५० टक्क्यांपर्यंतची भरघोस सूट देत आहेत. यामुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या पारंपरिक औषध विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Chemists' nationwide strike against online pharmacies: Millions of stores closed.

Web Summary : Over 1.5 million chemists nationwide strike against online pharmacies and corporate challenges. AIOCD calls for action, citing unfair competition, sale of spurious drugs, and government inaction on pandemic-era regulations, impacting small businesses.
टॅग्स :औषधंखरेदीऑनलाइनसंपहॉस्पिटल