BJP vs Sanjay Raut tweet on Donald Trump: "पश्चिम बंगालमधील विजयानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. यावर उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ट्रम्प यांनी खरे तर सर्व निवडणुकांमध्ये सर्वात मोठा भोपळा मिळाल्याबद्दल आणि आपले आमदार सांभाळता न आल्याबद्दल संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करायला हवे होते. आपल्या पक्षनेतृत्वाचे काय हाल झाले आहेत याचा विचार करा आणि मग ट्रम्प यांना ट्विट करून प्रश्न उपस्थित करा. भारताची लोकशाही अखेरचा श्वास घेत नाहीये. त्याची चिंता करू नका, तुमचा उबाठा गट अखेरचा श्वास घेत आहे. कारण तुमच्या पक्षाला घरी बसवण्याचे काम जनतेने केले आहे," अशा शब्दात संजय राऊतांच्या टीकेला भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कुणाला शपथविधीला बोलवायचं ते राज्यपाल ठरवतील
"तामिळनाडूत कुणाला शपथविधीसाठी बोलवायचे याचा निर्णय घेण्यासाठी तेथील राज्यपाल समर्थ आहेत. सर्वात मोठा पक्ष असला की त्याला बहुमतासाठी निश्चितपणे बोलावले जाते. तामिळनाडूत सध्या राजकीय स्थिती बदलत असून वेगवेगळ्या बैठका सुरू आहेत. त्यातून जो योग्य बहुमत सिद्ध करू शकेल, त्यालाच निश्चितपणे बोलावले जाईल. लोकभावनेचा आदर करण्याचे काम राज्यपालांच्या वतीने निश्चित केले जाईल. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद गेल्यापासून उद्धव आणि उबाठा गट अस्वस्थ आहेत. तामिळनाडूत उबाठा गटाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी, असे वाटत असेल तर संजय राऊत यांनी एक पत्र घेऊन राजभवनात जावे आणि महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला घरी बसवले, किमान तामिळनाडूत तरी आम्हाला शपथविधीला परवानगी द्या अशी मागणी करावी," अशा शब्दात बन यांनी खिल्ली उडवली.
पहाटेच्या शपथविधीवरून स्पष्टीकरण
"भगतसिंह कोश्यारी यांनी जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना शपथविधीची संधी दिली होती, तेव्हा सर्वात मोठा भाजपा पक्ष म्हणून बोलावले नव्हते. अजितदादांनी आपल्या आमदारांच्या समर्थनाचे पत्र कोश्यारी यांना दिले होते. त्या पत्राच्या आधारावर भाजपा आणि राष्ट्रवादीचे आमदार मिळून आकडा १४४च्या पुढे जात होता. म्हणून शपथविधीसाठी बोलवले होते. तुमच्यामध्ये एवढी हिंमत असेल, तर तुम्ही उद्धव ठाकरेंचे नाव घेऊन तामिळनाडूमध्ये समर्थनाचे पत्र घेऊन जा. राज्यपाल तुम्हालाही शपथविधीसाठी बोलवतील," असा खोचक टोला त्यांनी लगावला.
उबाठाला पोखरून काँग्रेस वाढतेय
"तुमची २५ वर्षे युतीमध्ये सडली होती. आता गेल्या सात वर्षांपासून तुम्ही युती तोडली. एकदा महाराष्ट्राला जाऊन सांगा. भाजपासोबत असताना तुम्हाला सन्मान मिळायचा, स्वाभिमानाने जगता यायचे. आज काँग्रेसबरोबर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची अवस्था काय झाली आहे? उबाठा गट आता सात वर्षांमध्ये काँग्रेसबरोबर जाऊन सडलाही आहे आणि किडलाही आहे. उबाठा गटाला कीड लागली आहे आणि उबाठा गटाला पोखरून काँग्रेस वाढत आहे. जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समिती निवडणूक, विधानसभा निवडणुकीमध्ये उबाठा गटाला पार पोखरून टाकण्याचे काम आणि गलितगात्र करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. उद्धव ठाकरे यांची किती अजून वाईट अवस्था तुम्ही करणार आहेत हे एकदा महाराष्ट्राला सांगा," असेही बन यांनी सुनावले.
Web Summary : BJP's Navnath Ban criticized Sanjay Raut's remarks on democracy and Trump, stating UbaThakare group is failing. He mocked their political standing, referencing Tamil Nadu and past government formations. Ban accused Congress of weakening UbaThakare's party, highlighting losses in local elections and erosion within the alliance.
Web Summary : भाजपा के नवनाथ बन ने संजय राऊत की लोकतंत्र और ट्रम्प पर टिप्पणी की आलोचना की, कहा कि उबाठा गुट विफल हो रहा है। उन्होंने तमिलनाडु और पिछली सरकार गठन का हवाला देते हुए उनकी राजनीतिक स्थिति का मजाक उड़ाया। बन ने कांग्रेस पर उबाठा की पार्टी को कमजोर करने का आरोप लगाया, स्थानीय चुनावों में नुकसान और गठबंधन के भीतर कटाव पर प्रकाश डाला।