“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 11:03 IST2025-12-16T11:03:16+5:302025-12-16T11:03:16+5:30
BJP Chandrashekhar Bawankule News: येत्या १९ डिसेंबरला देशात सर्वांत मोठा राजकीय भूकंप होईल, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता.

“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
BJP Chandrashekhar Bawankule News: येत्या १९ डिसेंबरला देशात सर्वांत मोठा राजकीय भूकंप होईल. भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल. मी जे बोललो त्याची पार्श्वभूमी कुणालाच माहिती नव्हती. आता मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल तर आत्ता त्या पदावर असलेल्या व्यक्तीला बाजूला गेले पाहिजे. बदल घडण्याची शक्यता मला दिसते. पण बदल घडला तर काँग्रेसचा पंतप्रधान होणार नाही कारण आमच्याकडे बहुमत नाही. भाजपाचाच पंतप्रधान होईल पण कदाचित मराठी माणूस होईल असा माझा संदर्भ होता, असा मोठा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. याला भाजपा नेत्यांनी उत्तर दिले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांचा थोडा बुद्धिभ्रंश झाला आहे. त्यांना काहीही बोलण्याची सवय लागली आहे. कुठे पंतप्रधानपदाचे स्वप्न बघतात, कोण जाणार, कोण येणार, आता जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते पृथ्वीराज चव्हाण हे झाले आहेत, असे मला वाटते, असा खोचक टोला भाजपा नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
भाजपा महायुती म्हणून सोबत लढणार
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणुकीत भाजप महायुती म्हणून सोबत लढणार आहोत. २९ महापालिकांमध्ये ५१ टक्के मते मिळवून दोन तृतियांश बहुमताने आम्ही जिंकू, असा आम्हाला विश्वास आहे. महायुतीतील घटक पक्षांसोबत प्रत्येक महापालिकानिहाय आमची चर्चा सुरू आहे. महायुती म्हणून एकत्रितपणे लढण्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या संदर्भात बैठक घेतली आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
दरम्यान, सर्वच महापालिकांमध्ये महायुती राहणार आहे, त्यामुळे स्वबळाचा आज तरी विचार नाही. ज्या निवडक ठिकाणी युती अशक्य असेल, त्या एक-दोन जागांवर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, पण महापालिका निवडणुकांमध्ये महायुती होईल, असे स्पष्टपणे दिसत आहे. नगरपालिकांच्या निवडणुकीशी महापालिका निवडणुकीची तुलना करणे योग्य नाही, त्या ठिकाणी परिस्थिती वेगळी होती, असे बावनकुळे यांनी सांगितले.