’देशात दोन विचारधारांची लढाई, काँग्रेसची विचारधारा संविधानवादी तर भाजपाची...’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 16:21 IST2026-02-28T16:19:02+5:302026-02-28T16:21:16+5:30
Harshwardhan Sapkal Criticize BJP: संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, तर हा देश फक्त मूठभर लोकांचा असावा, स्त्री-पुरुष समानता न मानणारा, स्पृश्य-अस्पृश्यता माननारा मनुवादी विचार भाजपाचा आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

’देशात दोन विचारधारांची लढाई, काँग्रेसची विचारधारा संविधानवादी तर भाजपाची...’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
मुंबई - देशात दोन विचारधारांची लढाई आहे, एक विचारधारा काँग्रेसची आहे तर दुसरी भाजपाची.काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील भारत वेगळा आहे. संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, तर हा देश फक्त मूठभर लोकांचा असावा, स्त्री-पुरुष समानता न मानणारा, स्पृश्य-अस्पृश्यता माननारा मनुवादी विचार भाजपाचा आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
चिपळूण येथे सुरु असलेल्या काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात दुसऱ्या दिवशी मार्गदर्शन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दोन विचारधारांमधील फरक स्पष्ट करुन सांगितला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपाला सत्ता, संपत्ती हवी आहे, सर्व यंत्रणांवर कब्जा हवा आहे, हिंसा, द्वेष, भय पसरवणे, असत्य कथन करणे व देश हा मुठभर लोकांच्या हाती असावा, अशी त्यांची संकल्पना असून आज त्याच पद्धतीचे वातावरण भारतात आहे. निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय, न्यायपालिका, सरकारी यंत्रणा अशा सर्व संस्थांवर भाजपाने कब्जा केला असून देशभर त्यांनी थैमान घातले आहे. भाजपा मनुस्मृती व ‘बंच ऑफ थॉट’ला अभिप्रेत भारत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे पण याच्या उलट काँग्रेसची विचारधारा आहे. हा देश सर्वांचा आहे, देशातील संपत्तीवर सर्व लोकांचा अधिकार आहे, सत्तेचे विकेंद्रीकरण हा काँग्रेसचा विचार आहे. संविधानानुसार देश चालला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे आणि या संविधानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचे, शिव, शाहु, फुले, आंबेडकर, संत, वारकरी संप्रदाय, बसवेश्वर महाराज यांचे विचार आहेत.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात पंडित जवारलाल नेहरु यांनी सहा बिगर काँग्रेसी नेत्यांना स्थान दिले होते. यामागे सर्व विचारधारांना सहभागी करुन घेणे हा विचार होता. पंतप्रधान पंडित नेहरुंची कॉलर एका सामान्य महिलेनी पकडून ‘स्वातंत्र्याने मला काय दिले’? अशी विचारणा केली, त्यावेळी नेहरुंनी त्या महिलेला अटक केली नाही उलट तिच्या प्रश्नाला शांतपणे उत्तर दिले. आजच्या भारतात अशी हिम्मत कोणी करु शकत नाही. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले तर त्यांना अटक करुन देशद्रोही असल्याचा अपप्रचार केला जात आहे. आज सरकारच्या विरोधात कोणी बोलू शकत नाही, अशी भयानक परिस्थिती देशात आहे. काँग्रेसला संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले पण काँग्रेस संपणार नाही. काँग्रेस पक्षाला मोठा वारसा लाभलेला आहे. ज्यांनी काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहिले तेच काँग्रेसयुक्त झाले आहेत. आपले नेते राहुल गांधी यांनी आपल्याला ‘डरो मत’चा संदेश दिला आहे. कोणत्याही दबावाला, दहशतीला न घाबरता विचारांची लढाई लढा आणि जो लढेल तोच जिंकेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.