१० दिवस आधीच पेपर हातात!; मोटेगावकरांना सीबीआयची अटक, लातुरात पोलीस बंदोबस्तात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 12:13 IST2026-05-19T12:11:01+5:302026-05-19T12:13:18+5:30

नीट पेपरफुटी प्रकरण: 'आरसीसी' क्लासेसचे प्रा. शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयकडून अटक; लातुरात पोलीस बंदोबस्त

NEET Paper Leaked 10 Days Before Exam! RCC Owner Prof. Shivraj Motegaonkar Arrested Over Latur-Pune Chemistry Connection. | १० दिवस आधीच पेपर हातात!; मोटेगावकरांना सीबीआयची अटक, लातुरात पोलीस बंदोबस्तात वाढ

१० दिवस आधीच पेपर हातात!; मोटेगावकरांना सीबीआयची अटक, लातुरात पोलीस बंदोबस्तात वाढ

लातूर : पुणे येथे चौकशीअंती आरसीसी कोचिंग क्लासेसचे संस्थापक प्रा. शिवराज मोटेगावकरला सीबीआयने अटक केल्याची बातमी सोमवारी सकाळी लातुरात धडकली. त्यानंतर कोचिंग क्लासेसच्या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून, तिसऱ्यांदा शहरात दाखल झालेले पथक ठाण मांडून आहे.

आरसीसी (रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस) कार्यालयात रविवारी दुपारनंतर सीबीआयच्या पथकाने तपासणी सुरू केली होती. त्याचवेळी प्रा. मोटेगावकर याची पुणे येथे सीबीआयसमोर चौकशी सुरू होती. यापूर्वी १५ मे रोजी पथकाने लातूर येथे येऊन प्रा. मोटेगावकरची चौकशी करून मोबाईल, सराव परीक्षेचे पेपर आणि इतर कागदपत्रे ताब्यात घेतली होती. दरम्यान, रविवारी उशिरापर्यंत चौकशी करून जप्त करण्यात आलेल्या डिजिटल पुराव्याच्या आधारावर ताब्यात घेऊन नंतर अटकेची कारवाई केली.

पी.व्ही. कुलकर्णी कनेक्शन; विद्यार्थिनीची चौकशी
केमिस्ट्रीचे पेपर सेटर प्रा. पी.व्ही. कुलकर्णी कनेक्शन आणि त्याच्या जबाबातून प्रा. मोटेगावकरचा संदर्भ समोर आल्याने अटक करण्यात आली असून, ज्यांना पेपर मिळाला त्यांचीही सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. लातूर येथील एका विद्यार्थिनीस व पालकास पुणे येथे चौकशीसाठी बोलाविण्यात आल्याचे वृत्त आहे.

३ मेचा पेपर २३ एप्रिलला
‘नीट’चा ३ मे रोजी झालेला पेपर २३ एप्रिल रोजीच मिळाला. प्रा. पी.व्ही. कुलकर्णीकडून केमिस्ट्रीचे १३२ प्रश्न मोटेगावकरकडे आले. त्यांनी ते प्रश्न पीडीएफ स्वरूपात समोर दिले. तर बहुतांश जणांकडे १ मे रोजी टेलिग्रामद्वारे प्रश्न पोहोचले होते. नाशिक, पुणे, लातूर असा उलगडा होत गेला.

लातूर, नांदेडची चर्चा का?
गेल्या अनेक वर्षांपासून ‘नीट’च्या निकालातील उच्चांकात लातूर आणि नांदेड चर्चेत आहे. दोन्ही ठिकाणी कोचिंग क्लासेस आणि हजारो विद्यार्थ्यांचा ओढा आहे. शाळा, महाविद्यालयांपासून सुरू झालेला पॅटर्न कोचिंगच्या निकालांनीही चर्चेत राहिला आहे. त्यामुळे २०२४ असो की २०२६ ची पेपरफुटी यामध्ये लातूर, नांदेड चर्चेत राहिले. परिणामी, पेपर फोडणाऱ्यांनी लातूर, नांदेडमधील विद्यार्थ्यांच्या गर्दीचा फायदा उचलत सावज टिपल्याचे दिसते. दरम्यान, लातुरात शिंदे सेनेने क्लासेससमोर आंदोलन करून पेपरफुटी प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली.

फोडणारे, मिळविणारे, पेपर मिळालेले
नीट पेपर फोडणारे, पेपर सेटर तसेच नाशिक कनेक्शन हा एक धागा असून, पैसे देऊन पेपर मिळविणारे ही दुसरी कडी आहे. तर शेवटच्या दोन दिवसांत व्हॉटस्ॲप आणि टेलिग्रामवरून पेपर मिळालेले अनेकजण आहेत. तपास यंत्रणांनी प्रथम पेपर फोडणारे, पेपर सेटर, नाशिकचे कनेक्शन उघडकीस आणले. आता प्रा. मोटेगावकरावरील कारवाईनंतर पुढे कोणा-कोणाला पेपर मिळाले आहेत, याचा तपास सीबीआय करीत आहे.

Web Title : NEET पेपर लीक: कोचिंग क्लास के संस्थापक गिरफ्तार, लातूर में सुरक्षा बढ़ी

Web Summary : नीट पेपर लीक मामले में सीबीआई ने आरसीसी कोचिंग क्लासेस के संस्थापक शिवराज मोटेगांवकर को गिरफ्तार किया। लातूर में पुलिस की मौजूदगी बढ़ाई गई। जांच से पता चला कि पेपर पीवी कुलकर्णी के माध्यम से लीक हुआ, जो परीक्षा से पहले छात्रों तक पहुंचा। लातूर और नांदेड़ की कोचिंग पैटर्न जांच के दायरे में।

Web Title : NEET Paper Leak: Coaching Class Founder Arrested, Latur Security Increased

Web Summary : RCC Coaching Classes founder Shivraj Motegaonkar arrested by CBI in NEET paper leak case. Police presence heightened in Latur. Investigation reveals paper leaked via PV Kulkarni, reaching students before exam. Latur and Nanded's coaching patterns under scrutiny.