Kolhapur News: तुमच्याशिवाय जगून काय करू; अपघातात संपूर्ण कुटुंबाला गमावले, तिथेच येऊन वडिलांनी विष पिऊन जीवन संपविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 12:17 IST2026-05-16T12:17:00+5:302026-05-16T12:17:37+5:30
मृत पुणे जिल्ह्यातील, कोल्हापुरातील मन हादरवून टाकणारी घटना

Kolhapur News: तुमच्याशिवाय जगून काय करू; अपघातात संपूर्ण कुटुंबाला गमावले, तिथेच येऊन वडिलांनी विष पिऊन जीवन संपविले
कोल्हापूर : काळाचा महिमा अगाध असतो; पण काही वेळा तो इतका क्रूर ठरतो की, माणुसकीही सुन्न होते. अडीच वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी रस्ते अपघातात आपल्या संपूर्ण कुटुंबाला गमावले होते, त्याच जागी जाऊन वडिलांनी आत्महत्या केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विराट गौतम (वय ५८, रा. मांजरी बुद्रूक, पुणे ) असे त्यांचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना ज्या ठिकाणी पत्नी आणि दोन मुलांचा भीषण अपघातात अंत झाला होता, त्याच कोल्हापूर-राधानगरी रोडवरील पुईखडी घाटात उघडकीस आली.
गोवा-मुंबई आराम बस भीषण अपघातात अडीच वर्षांपूर्वी त्यांच्या डोळ्यादेखत पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला होता. अपघातात ते स्वत:ही जखमी झाले होते. या घटनेतून ते कधीच सावरू शकले नाहीत. कुटुंबाच्या विरहाने ते नैराश्याने ग्रासले होते. अपघातात मृत्युमुखी पडल्यानंतर ते आठवड्यातून एकदा पुईखडी येथे येऊन पत्नी आणि मुलांची आठवण काढून रडत बसायचे. त्याच अपघातस्थळी धाव घेऊन विराट यांनी तिथेच आपले जीवन संपविले.
विराट दि. ९ मे रोजी पुण्यातून बाहेर पडले. १० आणि ११ मेदरम्यान ते पुईखडी येथील अपघाताच्या ठिकाणी आले होते. त्या ठिकाणी रडत बसल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले. ११ मेनंतर ते दिसून आले नाहीत. शुक्रवारी सकाळी परिसरातील काही नागरिक पुईखडी घाट परिसरात गेले असता त्यांना दुर्गंधी आली. त्यांनी हा प्रकार करवीर पोलिसांना सांगितला. ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्या खिशातील मोबाइल जप्त केला. त्या मोबाइलवरून मेसेज पाहून पोलिसही गहिवरले. दरम्यान, गौतम यांचा भाचा पश्चिम बंगाल येथून कोल्हापूरकडे येत आहे.
अडीच वर्षांपूर्वी कुटुंब गमावले होते
दि. २३ नोव्हेंबर २०२३ च्या मध्यरात्री कोल्हापूर ते राधानगरी रोडवरील पुईखडी घाटात गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या स्लिपर कोच खासगी आराम बसचा अपघात झाला होता. त्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा करुण अंत झाला होता. त्यात पुणे मांजरी बुद्रूक येथील नीलू गौतम (वय ४३ ), रिद्धिमा गौतम (१७) आणि सार्थक गौतम (१३) यांचा मृत्यू झाला होता. बसखाली अडकल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला होता.