एमडी ड्रग्जचे कारखाने सातारा, सांगलीत; कोल्हापूर पोलिसांकडून शोधमोहीम सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 17:30 IST2026-01-28T17:30:15+5:302026-01-28T17:30:31+5:30
केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाने कराड (जि. सातारा) तालुक्यातील पाचपुतेवाडी येथे एका पोल्ट्रीत छापा टाकून एमडी ड्रग्जनिर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला होता

एमडी ड्रग्जचे कारखाने सातारा, सांगलीत; कोल्हापूर पोलिसांकडून शोधमोहीम सुरु
कोल्हापूर : सातारा आणि सांगली जिल्ह्यात एमडी ड्रग्जचे (मेफेड्रॉन) कारखाने सुरू असल्याचे उघडकीस येताच कोल्हापूरपोलिसही अलर्ट मोडवर आले आहेत. जिल्ह्यातील बंद कारखाने, गोडावून, बंदिस्त इमारतींची तपासणी सुरू आहे. तसेच ड्रग्ज विक्रीचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली.
केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाने कराड (जि. सातारा) तालुक्यातील पाचपुतेवाडी येथे एका पोल्ट्रीत छापा टाकून एमडी ड्रग्जनिर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला होता. शनिवारी (दि. २४) केलेल्या कारवाईत सुमारे ५५ कोटींचे ड्रग्ज जप्त करून पाचजणांना अटक केली. यापूर्वी सांगली जिल्ह्यातही एमडी ड्रग्जच्या कारखान्यावर कारवाई झाली होती. शेजारच्या जिल्ह्यांमधील या गंभीर घटनांची दखल घेऊन कोल्हापूर पोलिस सतर्क झाले आहेत.
औद्योगिक वसाहतींसह इतर ठिकाणी असलेले बंद कारखाने, गोडाऊन, बंदिस्त इमारती, दुर्गम ठिकाणी असलेल्या इमारतींची तपासणी करण्याचे आदेश अधीक्षकांनी दिले आहेत. याबाबत विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे अधीक्षक योगेश कुमार यांनी सांगितले.
पोलिसपाटलांना सूचना
गावातील संशयित इमारतींची माहिती स्थानिक पोलिसांना देण्याच्या सूचना सर्व पोलिसपाटलांना दिल्या आहेत. पोलिसांकडूनही काही संशयित ठिकाणांची तपासणी सुरू आहे. आपल्या परिसरात काही संशयास्पद घडामोडी सुरू असल्यास स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.