पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 14:26 IST2026-05-17T14:25:48+5:302026-05-17T14:26:28+5:30
Russia News: जागतिक पातळीवर कमालीची युद्धजन्य आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली असताना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे एका पेक्षा एक अशा विध्वंसक हत्यारांचा साठा गोळा करत आहेत.

पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?
जागतिक पातळीवर कमालीची युद्धजन्य आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली असताना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे एका पेक्षा एक अशा विध्वंसक हत्यारांचा साठा गोळा करत आहेत. ही हत्यारे एवढी धोकादायक आहेत की, ज्यांचं एक बटण दाबताच संपूर्ण देश नष्ट होऊ शकतो. रशियाचे शास्त्रज्ञ अणुऊर्जेवर चालणारे ड्रोन, हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे, अवकाशात हल्ला करणारी हत्यारे आणि अणुउर्जेवर चालणारे पाणतीर विकसित करत आहेत. या सर्व घडामोडींमुळे जग १९६२ च्या क्युबा क्षेपणास्त्र संकटानंतरच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आण्विक संकटाच्या दिशेने वाटचाल करत आहे, अशी भीती पाश्चात्य विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.
रशियाकडून साठा करण्यात येत असलेल्या शस्त्रास्त्रांमधील प्रमुख शस्त्रास्त्रे खालील प्रमाणे आहेत.
पोसायडन: रशियाकडून साठा करण्यात येत असलेल्या सर्वात चर्चित हत्याराचं नाव पोसायडन आहे. हे अणुउर्जेवर चालणारं महाकाय अंडरवॉटर ड्रोन आहे. ते लहान पाणबुडीएवढं मोठं आहे. ते हजारो किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकते. तसेच शत्रूच्या किनाऱ्याजवळ गेल्यानंतर त्याचा स्फोट होतो.
बुरेवेस्तनिक: बुरेवेस्तनिक क्षेपणास्त्राला फ्लाइंग चेर्नोबिल असंही म्हटलं जातं. हे अणुशक्तीवर चालणारं क्रूझ क्षेपणास्त्र आहे. त्याची रेंज अमर्यादित असल्याचा दावा केला जातो. पुतिन यांच्या मते हे क्षेपणास्त्र अनेक दिवसांपर्यंत उडू शकतं.
सरमत: सरमत किंवा Satan-2 हे रशियाचं नवं आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. याचं वजन २०० टनाहून अधिक आहे. यामध्ये अनेक अण्वस्त्रे जोडता येतात. तसेच ती वेगवेगळ्या शहरांना लक्ष्य करू शकतात.
याशिवाय एवनगार्ड, किंझल, जिरकॉन यांसारखी हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे ही रशियाच्या ताफ्यात आहेत. तसेच यांचा वेग एवढा प्रचंड आहे की, ज्यामुळे सध्याची कुठलीही डिफेन्स सिस्टिम त्यांना रोखू शकत नाही.