VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 14:34 IST2026-05-17T14:28:22+5:302026-05-17T14:34:53+5:30
४१ हजार रुपयांचे घड्याळ खरेदी करण्यासाठी तरुणाईची झुंबड उडाली होती.

VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
AP x Swatch: इंटरनेटवरील महागडी आणि लक्झरी ब्रँड्सची क्रेझ तरुणाईच्या किती डोक्यात गेलीय, याचा प्रत्यय शनिवारी देशभरातील काही मॉलमध्ये पाहायला मिळाला. स्विस घड्याळ निर्माता कंपनी स्वॅच आणि जगप्रसिद्ध लक्झरी ब्रँड ऑडेमर्स पिगुए यांच्या रॉयल पॉप कलेक्शनच्या लाँचिंगवेळी बंगळुरू आणि मुंबईत प्रचंड गदारोळ झाला. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, सुरक्षारक्षकांना जमाव आवरताना बळाचा वापर करावा लागला. दुबईत तर सार्वजनिक सुरक्षेचा विचार करून हा इव्हेंटच रद्द करावा लागला.
पहाटेपासूनच लागल्या लांबच लांब रांगा
बंगळुरूच्या फिनिक्स मार्केटसिटी मॉलमध्ये शनिवारी पहाटेपासूनच शेकडो तरुण आणि घड्याळ प्रेमींनी गर्दी केली होती. मॉलचे दरवाजे उघडताच लोकांनी बॅरिकेड्स तोडून आत पळण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये लोक एकमेकांना ढकलत घड्याळ खरेदी करण्यासाठी धावताना दिसत आहेत. मॉलच्या बाउन्सर आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जमावाला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण गर्दीपुढे त्यांचे काहीच चालत नव्हते. अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकांना बळाचा वापर करून लोकांना रोखावे लागले.
मुंबईतील लाँचिंगच्या ठिकाणीही अशीच परिस्थिती होती. घड्याळ खरेदीसाठी आलेले आणि रिसेलर्स रात्रीपासूनच रांगेत उभे होते. मुंबईतील एका प्रत्यक्षदर्शीने आपला संताप व्यक्त करताना सांगितले, "आम्ही काय जनावरं आहोत का. रांगेतील ढकलाढकली आणि शिवीगाळ पाहून या खरेदीतला सगळा आनंदच निघून गेला. आम्ही अगदी पुढे होतो, पण धक्काबुक्कीमुळे आम्हाला मागे जावे लागले. एका घड्याळासाठी एवढा त्रास सहन करावा लागला."
दुबईत इव्हेंट रद्द
फक्त भारतातच नाही, तर जगभरात या घड्याळाची मोठी क्रेझ पाहायला मिळाली. दुबईतील दुबई मॉल आणि मॉल ऑफ दि एमिरेट्सबाहेर पहाटे ६:४५ वाजताच लोकांची गर्दी झाली होती. ५ ते ७ तास पार्किंगमध्ये थांबूनही लोकांना घड्याळ मिळाले नाही. अखेर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे पाहून स्वॅच कंपनीने दुबईतील विक्री तात्पुरती रद्द केली. कंपनीने इन्स्टाग्रामवर म्हटले की, "सार्वजनिक सुरक्षेचा विचार करून आम्ही दुबई मॉल आणि मॉल ऑफ दि एमिरेट्समधील विक्री रद्द करत आहोत."
नक्की काय आहे 'AP x Swatch' आणि एवढी क्रेझ का?
स्वॅच कंपनी आपल्या बजेट-फ्रेंडली घड्याळांसाठी ओळखली जाते. मात्र, गेल्या काही काळापासून ती ओमेगा आणि ब्लाँकपेन सारख्या अति-लक्झरी ब्रँड्ससोबत परवडणाऱ्या किमतीत विशेष कलेक्शन आणत आहे. यावेळी त्यांनी Audemars Piguet या जगातील सर्वात महागड्या ब्रँड्सोबत रॉयल पॉप कलेक्शन आणले आहे.
भारतात या घड्याळांची किंमत ४१,००० ते ४४,००० च्या दरम्यान आहे. लेपिन मॉडेल ४१,००० ला तर सॅव्होनेट मॉडेल ४४,००० ला उपलब्ध आहे. हे मनगटी घड्याळ नसून पॉकेट वॉच आणि बायोसिरॅमिक प्रकारातील लिमिटेड एडिशन आहे. हे घड्याळ ऑनलाईन उपलब्ध नाही. ते फक्त निवडक स्टोअर्समध्येच प्रत्यक्ष जाऊन खरेदी करावे लागणार असल्याने स्टोअर्सबाहेर एवढी गर्दी झाली होती.
All these guys are running to buy a Rs 41,000 watch. You might argue, they look like the 3rd pillion rider of a Splendour in a Small town, how can they afford to buy this watch?
— Gabbar (@GabbbarSingh) May 17, 2026
They can’t. But they know, it’s sought after, so they will resell for profit pic.twitter.com/rpf5vvRPAB
सोशल मीडियावर वाद
या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी तरुणांच्या या वेडेपणावर तीव्र आक्षेप घेतला आहे. एका युझरने, "इंटरनेटवरील हायपे आणि रिसेल संस्कृतीमुळे लोक आपले मानसिक संतुलन गमावत आहेत. एका प्लॅस्टिकच्या घड्याळावर लक्झरी लेबल आहे म्हणून लोक पहाटे ५ वाजता मॉलवर दरोडा टाकत आहेत," असं म्हटलं. दुसऱ्या एका युझरने, "लोकांना माहीत नाही की हे रिस्टवॉच नसून पॉकेट वॉच आहे. एका पॉकेट वॉचसाठी एवढा वेडेपणा सुरु आहे," असं म्हटलं. काहींच्या मते, भारतातील सामान्य जनतेला हा ब्रँड माहीतही नाही, हा फक्त उच्चभ्रू लोकांपर्यंतच मर्यादित विषय आहे.