Shaktipeeth Highway: शक्तीपीठविरोधी चळवळीत शेतकऱ्यांसोबत, कोल्हापुरातील महायुतीतील आमदाराने जाहीर केली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 15:33 IST2026-05-18T15:32:26+5:302026-05-18T15:33:29+5:30
संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची भेट

Shaktipeeth Highway: शक्तीपीठविरोधी चळवळीत शेतकऱ्यांसोबत, कोल्हापुरातील महायुतीतील आमदाराने जाहीर केली भूमिका
कोल्हापूर : जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघाचे आमदारविनय कोरे यांनी रविवारी आपली शक्तीपीठविरोधी भूमिका जाहीर केली. शक्तीपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने रविवारी वारणानगर येथे कोरे यांची भेट घेतली. यावेळी कोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आपण शेतकऱ्यांसोबत असल्याचे सांगितले.
यावेळी बाधित शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आमदार कोरे म्हणाले, पर्यायी उपलब्ध रस्ते असताना अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या पिकाऊ शेतजमिनी घेऊन महामार्ग करणे, या धोरणाशी मी सहमत नाही. शेतकऱ्यांची विरोधाची भूमिका सरकारपर्यंत पोहोचवू. तज्ज्ञांची चर्चा करून या महामार्गास सरकारला पर्याय सुचवू. कायदेशीर सल्लादेखील घेऊ. या प्रश्नावर मी शेतकऱ्यांसोबत आहे. मंगळवारी मेळाव्याला मी गैरहजर राहिलो, तरी माझे प्रतिनिधी, कार्यकर्ते असतील.
गिरीश फोंडे म्हणाले, शक्तीपीठ महामार्गविरोधी संघर्ष समिती ही बाधित शेतकऱ्यांचा मंच सर्वपक्षीय आहे. आमदार म्हणून तुम्ही बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनास बळ द्यावे. मेळाव्यास उपस्थित राहावे. यावेळी नितीन हुजरे, राजेंद्र जाधव, शिवाजी सिद, दीपक जाधव, राहुल जाधव, किरण पाटील, मच्छिंद्र जाधव, पिंटू भोसले, मिलिंद जाधव यांच्यासह हातकणंगले - पन्हाळा तालुक्यातील नवे जुने पारगाव, बहिरेवाडी, जाखले, कुशिरे, पोहाळे गावातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी उपस्थित होते.