गोकुळ'च्या ६३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच प्रशासक; कामकाज हाताळण्याचे राहणार आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 11:14 IST2026-05-04T11:12:59+5:302026-05-04T11:14:09+5:30
'गोकुळ'ची निवडणूक घेण्याआधीच ज्या पद्धतीने आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत ते पाहता प्रशासकांनीही कामकाज करताना काही प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो.

गोकुळ'च्या ६३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच प्रशासक; कामकाज हाताळण्याचे राहणार आव्हान
कोल्हापूर: गोकुळ'च्या ६३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासक येत आहे. सहकारी बँकांसह साखर कारखान्यांच्या कामकाजापेक्षा दूध संघाचे काम वेगळे आहे, त्यामुळे येणारे प्रशासक किंवा प्रशासकीय मंडळासमोर कामकाज हाताळण्याचे खरे आव्हान राहणार आहे. दूध संघात प्रत्येक तासाला नवीन प्रश्न निर्माण होतात, त्याची वेळेत सोडवणूक करून प्रश्न मार्गी लावला तरच दुधाची पिशवी ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे हे आव्हान प्रशासकांना पेलावे लागणार आहे.
दूध उत्पादकांच्या घामाला न्याय देण्यासाठी १६ मार्च १९६३ला 'गोकुळ' दूध संघाची स्थापना झाली. गेल्या ६३ वर्षात संघ जिल्ह्याच्या अर्थकारणाचे केंद्रबिंदू बनला. जिल्ह्याची शिखर संस्था केडीसीसी बँकेवर आतापर्यंत दोन वेळा प्रशासक आले, पण 'गोकुळ'वर प्रथमच प्रशासक येत असल्याने संघाशी जोडलेल्या सर्वच घटकांमध्ये काहीशी अस्वस्थता आहे. यापूर्वी 'केडीसीसी बैंक, 'बिद्री' व "भोगावती' कारखान्यांवर प्रशासकीय मंडळ आले होते. बँक असो वा साखर कारखाना त्यांचे कामकाज व दूध संघ यांच्यात फरक आहे.
'गोकुळ'ची निवडणूक घेण्याआधीच ज्या पद्धतीने आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत ते पाहता प्रशासकांनीही कामकाज करताना काही प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो. आव्हान देऊन प्रशासक आणला जात असल्याने साहजिकच 'गोकुळ'च्या राजकीय विश्वात अस्वस्थता अधिक आहे.
'गोकुळ'चे आतापर्यंत झालेले अध्यक्ष
एन. टी. सरनाईक- १६ मार्च १९६३ ते २८ मे १९७१
आनंदराव पाटील-चुयेकर- २९ मे १९७१ ते ३ डिसेंबर १९९०
अरुण नरके - ३ डिसेंबर १९९० ते १३ डिसेंबर २०००
आनंदराव पाटील-चुयेकर- २३ डिसेंबर २००० ते २१ नोव्हेंबर २००१
रणजितसिंह पाटील - २१ नोव्हेंबर २००१ ते ६ डिसेंबर २००४
विश्वास पाटील - ६ डिसेंबर २००४ ते २ डिसेंबर २००६
राजकुमार हत्तरकी- २ डिसेंबर २००६ ते २८ नोव्हेंबर २००८
रवींद्र आपटे - २८ नोव्हेंबर २००८ ते ३० नोव्हेंबर २०१०
अरुण डोंगळे - ३० नोव्हेंबर २०१० ते १७ ऑक्टोबर २०१३
दिलीप पाटील- १७ ऑक्टोबर २०१३ ते ७ मे २०१५
विश्वास पाटील - ७ मे २०१५ ते १४ जानेवारी २०१९
रवींद्र आपटे - १४ जानेवारी २०१९ ते १३ मे २०२१
विश्वास पाटील - १४ मे २०२१ ते १३ मे २०२३
अरुण डोंगळे १३ मे २०२३ ते १४ मे २०२५
नवीद मुश्रीफ १४ मे २०२५ ते आतापर्यंत