विनोद खुटेसह उचगावच्या दिगंबर तोरसकरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश; जादा परताव्याच्या आमिषाने पैसे गोळा केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 17:30 IST2026-05-15T17:27:22+5:302026-05-15T17:30:32+5:30
व्हीआयपीएस ग्रुप, जीएबीमधील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण

विनोद खुटेसह उचगावच्या दिगंबर तोरसकरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश; जादा परताव्याच्या आमिषाने पैसे गोळा केल्याचा आरोप
कोल्हापूर : व्हीआयपीएस ग्रुप व ग्लोबल अफिलिएट बिझनेस (जीएबी) मधील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मुख्य आरोपी विनोद तुकाराम खुटे याच्यासह सर्व आरोपींना नयायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई येथील विशेष पीएमएलए (ईडी) न्यायालयाने हे महत्त्वपूर्ण आदेश दिले असून, यामध्ये करवीर तालुक्यातील उचगाव येथील दिगंबर गणपत तोरसकर याचा समावेश आहे. ही माहिती ईडीचे साक्षीदार शरद माळी यांनी दिली. या प्रकरणी ‘ईडी’ने उचगावात याआधी छापेही टाकले होते.
विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी शुक्रवारी (दि. ८) दिलेल्या आदेशात विनोद तुकाराम खुटे, किरण पितांबर अनारसे, मंगेश सीताराम खुटे, संतोष तुकाराम खुटे, अजिंक्य रावसाहेब बडदे, दिगंबर गणपत तोरसकर( रा. प्लॉट नं. १७, हुंकार कॉलनी, गल्ली नंबर ४, उचगाव) आदी आरोपींविरुद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध होत असल्याचे नमूद केले आहे. सर्व आरोपींना १२ जूनला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणात विशेष सरकारी वकील ॲड. कविता पाटील यांनी ईडीची बाजू न्यायालयात मांडली. ईडीने सादर केलेली कागदपत्रे, साक्षीदारांचे जबाब, पैशांच्या व्यवहारांचा मागोवा पाहता आरोपींविरुद्ध प्रथमदर्शनी पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याचे दिसते. तसेच मनी लाँडरिंग हा गंभीर आर्थिक गुन्हा असून, तो समाजाच्या आर्थिक स्थैर्यावर आणि देशाच्या अर्थकारणावर परिणाम करणारा असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे. या प्रकरणात अनेक गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप असून, पीडित गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर पातळीवर हालचाली सुरू आहेत. काही गुंतवणूकदारांच्या वतीने ॲड. विकास शिंदे काम पाहत आहेत.
पैसा वळवण्यात आल्याचा संशय
या आरोपींनी विविध कंपन्या, परकीय चलन व्यवहार, क्रिप्टो चलन व्यवहार, बहुपातळी विपणन योजना, तसेच आकर्षक गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जादा परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तपास झाल्यानंतर ही रक्कम १०० कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत असून त्या निधीचे बनावट कंपन्या, हवाला व्यवहार आणि क्रिप्टो चलनाच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने हस्तांतरण करण्यात आल्याचा आणि हे पैसे वळवण्यात आल्याचा ईडीला संशय आहे.