डंपर दिसताच आईने मुलाला बाजूला फेकले; गुरुद्वाराच्या पुजाऱ्याचा पत्नीसह मृत्यू, मुलगा बचावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 17:40 IST2025-09-27T17:37:48+5:302025-09-27T17:40:47+5:30
जळगावात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक मुलगा बचावला.

डंपर दिसताच आईने मुलाला बाजूला फेकले; गुरुद्वाराच्या पुजाऱ्याचा पत्नीसह मृत्यू, मुलगा बचावला
Jalgaon Accident: जळगावात मुरूमची वाहतूक करणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील डंपरने दुचाकीवरील चार जणांना जवळपास ५० ते ६० फूट फरफटत नेल्याने झालेल्या भीषण अपघातात वडील, आई आणि मुलगा असे एकाच परिवारातील तीन जण जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला. ही घटना पूर्णाड फाटा इथे शुक्रवारी दुपारी १२:३० वाजता घडली. या अपघातानंतर संतप्त जमावाने डंपर पेटवून दिला. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.
नितेश जगतसिंग चौहान (३२), सुनीता नितेशसिंग चौहान (२५) आणि शिव नितेशसिंग चौहान (७) अशी मयतांची नावे आहेत. तर नेहालसिंग नितेशसिंग चौहान (११) हा बालक जखमी झाला आहे. गेल्या दोन वर्षापासून जळगाव येथील श्री गुरुसिंह गुरुद्वारा येथे पुजारी म्हणून काम करणारे नितेशसिंग जगजितसिंग चौहान हे शुक्रवारी सकाळी नित्य पूजाअर्चा करून गावाकडे जायला निघाले. कौटुंबिक कार्यक्रम आटोपून संध्याकाळपर्यंत परत येतो, असे सांगून गेलेल्या चव्हाण यांच्या मृत्यूची वार्ताच जळगावात धडकल्याने गुरुद्वारातील सर्व पदाधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णाड फाटा परिसरात इंदूर-हैद्राबाद महामार्गाचे काम सुरू आहे. यासाठी संबंधित ठेकेदार कंपनीचे मुरूम भरलेले डंपर जात होते. यातील एका डंपरने दुचाकीवर असलेल्या नितेश चौहान यांच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे चारही जण डंपरखाली आले. चालकाने जवळपास ५० ते ६० फूट अंतरापर्यंत चारही जणांना फरफटत नेले. चौहान परिवारातील हे चारही जण इच्छापूर येथे देवीच्या दर्शनासाठी जात होते. मात्र इच्छापूर येथे जाण्याआधी पूर्णाड फाट्यावर अपघातात त्यांना काळाने गाठले.
नितेशसिंग चौहान हे दोन वर्षांपासून जळगाव येथे गुरुद्वारामध्ये पुजारी म्हणून काम पाहत होते. मालापूर हे मूळ गाव असल्याने तेथे ते अधूनमधून जात. शुक्रवारी नातेवाइकांकडे कौटुंबिक कार्यक्रमासाठी जायचे म्हणून ते पत्नी व दोन मुलांसह दुचाकीवरून निघाले. पूर्णाड फाट्याजवळ पोहोचल्यानंतर वळण घेण्यासाठी ते थांबले असता मागून येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांना धडक दिली. त्यात तिघांचा मृत्यू झाला, तर अकरा वर्षीय मुलगा जखमी झाला आहे.
वळण घेण्यासाठी थांबलेले असताना मागून भरधाव येणारा वाळूचा डंपर दिसताच आईने नेहाल सिंग या मुलाला बाजूला फेकले त्यामुळे तो बचावला. अपघातात नेहाल सिंग बचावला असून, जळगाव येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.