मंत्रालयीन अधिकाऱ्याचा आगाऊपणा; नातेवाईकाला पाठवलेल्या 'त्या' पत्रामुळे ज्वारी खरेदी केंद्रावर गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 14:09 IST2026-04-11T14:04:34+5:302026-04-11T14:09:31+5:30
पारोळा येथील ज्वारी नोंदणी केंद्रांवर जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या आदेशांपूर्वीच शेतकऱ्यांची गर्दी झाली होती

मंत्रालयीन अधिकाऱ्याचा आगाऊपणा; नातेवाईकाला पाठवलेल्या 'त्या' पत्रामुळे ज्वारी खरेदी केंद्रावर गोंधळ
जळगाव : ज्वारी खरेदी केंद्रांवर नोंदणीची प्रक्रिया राबविण्यासाठी झालेल्या निर्णयाचे आदेश पत्राची प्रत मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने नातलगांना व्हायरल केली आणि त्यातून जिल्हा प्रशासनाने नोंदणीची प्रक्रिया हाती घेण्यापूर्वीच गर्दी झाल्याचा प्रकार प्रशासनाच्या निरीक्षणातून स्पष्ट झाली आहे. त्यामुळे मंत्रालयीन अधिकाऱ्याचा 'आगाऊ 'पणामुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
भडगाव आणि पारोळा येथील ज्वारी नोंदणी केंद्रांवर जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या आदेशांपूर्वीच शेतकऱ्यांची गर्दी झाली होती. राज्य शासनाच्या पणन विभागाकडून ज्वारी नोंदणी व खरेदीचा कार्यक्रम निश्चीत करण्यात आला होता. हा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाच्या हातात पडण्याआधीच नोंदणी केंद्रांवर गर्दी झालीच कशी, याची विचारणा व्हायला लागली होती. त्यानुसार प्रशासनाने पारोळा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यातून पणन मंत्रालयातील एका अधिकान्याने पारोळा तालुक्यातील नातेवाइकाला नोंदणी प्रक्रियेची माहिती व्हायरल केली आणि नातेवाइकाने ती माहिती वैयक्तिक न ठेवता सर्वत्र व्हायरल केली. त्यातून शेतकऱ्यांनी गर्दी करायला सुरुवात केल्याचा प्रकार स्पष्ट झाला आहे.
नोंदणी सुरळीत
पहिल्या तीन दिवसांत नोंदणी केंद्रांवर शेतकरी रात्री मुक्कामी थांबले. त्यानंतर पहाटेपासूनच रांगा लागल्या. शेतकऱ्यांचे वाद विकोपाला गेल्याने भडगावमध्ये पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिसांनी गर्दी पांगविण्यासाठी लाठीमार केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
तहसीलदारांना भेटीचे निर्देश
मंत्रालयातील अधिकाऱ्याच्या आगाऊपणामुळे जिल्हा प्रशासनालाही काम लागले. पारोळा व भडगावमधील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही तहसीलदारांना नोंदणी केंद्रांवर जाण्याचे आदेश दिले. त्यानुसार दोन्ही तहसीलदारांनी पोलिसांकरवी शेतकऱ्यांची नोंदणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली.
दरम्यान, पहिल्या तीन दिवसानंतर दोन्ही तालुक्यांतील नोंदणी केंद्रांवरची गर्दी पूर्णतः ओसरली आहे. तर, यावल, रावेर, चोपडा, अमळनेर, धरणगाव, पाचोरा व चाळीसगावमध्ये नोंदणी प्रक्रियेदरम्यान गर्दी झाली नसल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी सुनील मेने यांनी दिली.