इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवारी सनराइजर्स हैदराबादच्या २ खेळाडूंनी केलेल्या कामगिरीनं अनेकांचे लक्ष वेधले. यातील एक नाव प्रफुल हिंगे, ज्याने पहिल्याच षटकांत ३ विकेट घेऊन राजस्थान रॉयलची झोप उडवली. दुसरीकडे बिहारचा साकीब हुसैन, जो अत्यंत गरीब कुटुंबातून पुढे आला असून कधीकाळी त्याच्याकडे खेळायला बूटही नव्हते. शेतात मजुरी करणाऱ्या वडिलांच्या मुलाने आज क्रिकेट विश्वात नाव कमावलं. साकीबला आयपीएलमध्ये त्याचे टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली आणि या संधीचे त्याने सोने केले.
साकीबने त्याच्या डेब्यू मॅचमध्ये ४ विकेट घेऊन आपली छाप पाडली. राजस्थान रॉयल्सची टीम मागील ४ सामन्यात सातत्याने विजय मिळवत होती, त्यामुळे साकीबची ही कामगिरी आठवणीत राहणारी ठरली. राजस्थान रॉयल्सची फलंदाजी स्फोटक मानली जाते, मात्र साकीबच्या माऱ्यासमोर ते वादळ शांत राहिले. कुठल्याही खेळाडूला दीर्घ काळ वाट पाहणे आणि येताच उल्लेखनीय कामगिरी करणे सोपे नसते. बिहारचा हा वेगवान गोलंदाज साकीबने मिळालेल्या संधीला सोडले नाही. साकीबने प्रफुल हिंगेसोबत मिळून राजस्थानला आसमंत दाखवले. या दोघांनी प्रत्येकी ४-४ विकेट्स घेऊन हैदराबादला दुसरा विजय मिळवून दिला.
साकीबचा आयपीएल प्रवास एका त्यागाची कहाणी आहे. २००४ मध्ये एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या साकीबने लहानपणापासून गरिबी पाहिली आहे. त्याचे वडील अहमद हुसैन हे शेतकरी होते. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्यांना काम सोडावे लागले. त्यामुळे आता आपल्यालाच कुटुंबाचा आधार बनावे लागणार हे साकीबला लवकर कळलं. साकीबला भारतीय सैन्यात भरती व्हायचे होते, त्यामुळे तो मैदानात कित्येक किमी धावायचा. त्यात त्याने क्रिकेटचा चेंडू हाती घेतला आणि नियतीने त्याला या खेळात जास्तच रमवले. घर चालवण्यासाठी साकीबने आसपास परिसरात टेनिस बॉल क्रिकेट खेळणे सुरू केले. एका मॅचसाठी त्याला ५०० ते १००० रुपये मिळायचे. ही रक्कम जास्त नव्हती परंतु त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा.
जेव्हा साकीबने वेगवान गोलंदाजीत करिअर करायचे ठरवले तेव्हा यासाठी योग्य किट, बूट याची गरज भासू लागली. घरची परिस्थिती बिकट, त्यामुळे हे स्वप्न पाहणे दूरच होते. त्यावेळी साकीबच्या आईने दागिने विकून त्याला बूट घेतले. आईने दिलेली भेट पाहून साकीब भावूक झाला आणि त्याने आधीपेक्षा जास्त मेहनत करणे सुरू केले. हळूहळू त्याचा खेळ सुधारत होता. एकदा सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत केकेआरनं त्याची गोलंदाजी पाहिली आणि त्याला पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. केकेआरसोबत १ वर्ष घालवला. परंतु त्याला खेळण्याची एकही संधी मिळाली नाही. २०२६ मध्ये हैदराबादने त्याला टीममध्ये घेतले आणि पहिल्याच सामन्यात साकीबने त्याची निवड योग्य कशी होते हे जगाला दाखवून दिले.