साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 13:24 IST2026-04-14T13:23:27+5:302026-04-14T13:24:08+5:30
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने संपत्ती जाहीर केली आहे.

साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
नेपाळमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भ्रष्टाचारविरोधी प्रतिमा आणि सामान्य जनतेचा नेता म्हणून सत्तेवर आलेले पंतप्रधान बालेन्द्र शाह आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आपली संपत्ती जाहीर केली आहे. मात्र, या संपत्तीच्या आकड्यांनी नेपाळच्या जनतेच्या भुवया उंचावल्या असून, नव्या वादाला तोंड फुटले आहे. १४ दशलक्ष रोख रक्कम आणि तब्बल १९० तोळे सोन्याची घोषणा केल्यानंतर शाह यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.
पदभार स्वीकारताच मालमत्तेचा खुलासा
नेपाळच्या कायद्यानुसार, मंत्रीपद मिळाल्यानंतर ६० दिवसांच्या आत संपत्ती जाहीर करणे बंधनकारक आहे. मात्र, बालेन शाह यांच्या मंत्रिमंडळाने पदभार स्वीकारल्यानंतर महिनाभरातच ही माहिती सार्वजनिक करून पारदर्शकतेचा प्रयत्न केला. पण हाच प्रयत्न आता त्यांच्या अंगलट येताना दिसत आहे. जमीन, सोने, शेअर्स आणि बँक बॅलन्सची आकडेवारी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.
पंतप्रधान बालेन शाह यांची डिजिटल कमाई?
पंतप्रधानांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या बँक खात्यात १४.६ दशलक्ष रुपये जमा आहेत. विशेष म्हणजे, या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत त्यांनी फेसबुक आणि यूट्यूब सारखे 'डिजिटल प्लॅटफॉर्म' असल्याचे सांगितले आहे. याशिवाय काठमांडू, धनुषा आणि महोत्तरी जिल्ह्यांत त्यांची घरे आणि जमिनी आहेत. १९० तोळे सोने हे पूर्वजांकडून मिळालेली मालमत्ता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मंत्रिमंडळही मालामाल!
केवळ पंतप्रधानच नाही, तर त्यांचे मंत्रीही गर्भश्रीमंत असल्याचे समोर आले आहे.
अर्थमंत्री स्वर्णिम वागले: यांची शेअर्समध्ये १९ दशलक्ष रुपयांची गुंतवणूक असून बँकेत ९ दशलक्ष रुपये जमा आहेत. ललितपूरमध्ये २० दशलक्ष रुपयांचे घर आणि विविध ठिकाणी १०७.५ दशलक्ष रुपयांची जमीन त्यांच्या नावावर आहे.
गृहमंत्री सुदान गुरुंग: यांच्याकडे ४३.१ दशलक्ष रुपयांचे शेअर्स आणि ८९ तोळे सोने आहे. त्यांच्याकडे तीन जिल्ह्यांमध्ये मोठी जमीन जुमला आहे.
जनतेचा संताप आणि चौकशीची मागणी
भ्रष्टाचाराविरोधात झालेल्या जनआंदोलनानंतर बालेन शाह सत्तेवर आले होते. त्यांनी नेहमीच व्हीआयपी संस्कृतीला विरोध केला आहे. मात्र, आता समोर आलेल्या अफाट संपत्तीमुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. सोमवारी काठमांडूमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शनं करत या संपत्तीच्या स्त्रोतांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. "एवढी संपत्ती आली कुठून?" असा सवाल आता सामान्य नेपाळी नागरिक विचारत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, संपत्ती जाहीर करणे हा पारदर्शकतेचा भाग असला तरी, उत्पन्नाचे ठोस पुरावे सादर केल्याशिवाय बालेन शाह यांना या वादातून बाहेर पडणे कठीण जाईल.