५३ हजार हेक्टरवरील शेती धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:27 AM2019-08-26T00:27:23+5:302019-08-26T00:27:43+5:30

पाण्याअभावी ५३ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीही धोक्यात आली आहे.

Thousands of hectares of agriculture endangered! | ५३ हजार हेक्टरवरील शेती धोक्यात!

५३ हजार हेक्टरवरील शेती धोक्यात!

googlenewsNext

शेषराव वायाळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : तालुक्यासाठी वरदान ठरलेला निम्न दुधना प्रकल्प पावसाअभावी कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. प्रकल्पात अल्पसा पाणीसाठा असून, परतूर, सेलू, मंठा शहरासह ग्रामीण भागातील पाणी प्रश्न बिकट बनला आहे, तर पाण्याअभावी या प्रकल्पावर आधारित असलेल्या ५३ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीही धोक्यात आली आहे.
मागील वर्षी तालुक्यात आजपर्यंत ४७२. ६० मी.मी. पाऊस झाला होता. तर यंदा आजवर केवळ २७१. ८९ मी.मी. पाऊस झाला आहे. म्हणजेच केवळ ३७.७६ टक्के पाऊस अद्याप झालेला आहे. हा पाऊस ही भिज पावसाप्रमाणे झाला. त्यामुळे नदी, नाले, तलाव, धरण यांसह इतर जलस्त्रोत कोरडे ठाक आहेत.
तालुक्यासह परिसराला वरदान ठरलेला निम्न दुधना प्रकल्पही कोरडाच आहे. यंदा एकही थेंब या धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली नाही. उलट उपलब्ध असलेला मृत साठा दिवसेंदिवस घटत आहे. या धरणात असलेले पाणी उन्हाळ््यामध्ये परभणीसाठी सोडण्यात आले होते. यामुळे धरण रिकामे झाले. सद्यस्थितीत धरणात जिवंत पाणी साठा उणे -१९. ७१ दलघमी असून मृतसाठा ५४.५४६ दलघमी आहे. या धरणाच्या पाण्यावर जवळपास ५५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. हे सिंचन क्षेत्रही आता धरणात पाणी नसल्याने अडचणीत आले आहे. याबरोबरच या धरणाच्या पाण्यावर परतूर, सेलू, मंठा, डासाळासह इतर गावच्या पाणी पुरवठा योजना सध्या पाण्यासाठी झुंज देत आहेत. धरणाची पाणी पातळी घटल्याने बॅक वॉटरही खाली गेले आहे. यामुळे पाणी पुरवठा योजना पंप, पाईप टाकून पाणी ओढत आहेत. पाणीही गाळ युक्त असल्याने नागरीकांना मिळणारे पाणी अस्वच्छ मिळत आहे. धरणातील हा मृत साठा किती दिवस पुरणार ? हा प्रश्न आहे. बॅक वॉटर खाली गेल्याने दुधना नदीचे पात्र कोरडे पडले आहे. दरवर्षी या दिवसात बॅक वॉटरने डबडबलेल्या दुधना नदीच्या पात्रात यंदा मात्र गवत उगवले आहे.
४निम्न दुधनाच्या बॅक वॉटर वर परतूर तालुका व परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढले आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून दुधनावरून पाईपलाईन करून सिंचनाची सोय केली. मात्र, यंदा दुधना नदीच्या पात्रात पाण्याचा थेंबही नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

Web Title: Thousands of hectares of agriculture endangered!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.