बांबू वृक्षाचे रोपण ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST2021-07-07T04:37:13+5:302021-07-07T04:37:13+5:30

जालना : पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमानात सातत्याने वाढ होत असून, या तापमानवाढीला जीवाश्म इंधनाचे ज्वलन आणि वृक्षतोड या दोन ...

Planting a bamboo tree is a need of the hour | बांबू वृक्षाचे रोपण ही काळाची गरज

बांबू वृक्षाचे रोपण ही काळाची गरज

जालना : पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमानात सातत्याने वाढ होत असून, या तापमानवाढीला जीवाश्म इंधनाचे ज्वलन आणि वृक्षतोड या दोन प्रमुख बाबी कारणीभूत आहेत. तापमानवाढीचे होणारे परिणाम हानीकारक असून, मनुष्य जाती कायम टिकण्यासाठी वृक्ष लागवड हाच पर्याय आहे. इथेनॉल, वीजनिर्मितीमध्ये अधिक प्रमाणात उपयुक्त असण्याबरोबरच कमी खर्चात, कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणाऱ्या बांबू या वृक्षांचे रोपण ही काळाची गरज बनली असल्याचे माजी आमदार पाशा पटेल यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बांबू वृक्ष लागवड कार्यशाळेत ते बोलत होते.

या कार्यशाळेला माजी आमदार तथा राष्ट्रीय ग्रामीण विकास एवं पंचायत संस्थेचे सदस्य पाशा पटेल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल, रामेश्वर भांदरगे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बांबू लागवड मार्गदर्शक संजीव करपे, डॉ. कदम, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर यांच्यासह सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना माजी आमदार पाशा पटेल म्हणाले, औद्योगिकीकरणामुळे, जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे तसेच वृक्षांच्या तोडीमुळे वातावरणातील कार्बनचा स्तर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्या प्रमाणात वृक्षांची तोड केली जाते, त्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात येत नसल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. निसर्गाचा समतोल राखला जाऊन अधिक प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती होऊन कार्बनचे उत्सर्जन कमी करणाऱ्या बांबू वृक्ष लागवडीला प्राधान्य देण्याची गरज आहे. बांबू वृक्ष हा अत्यंत कमी पाण्यात व कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा वृक्ष आहे. एका एकरमध्ये ५० टन बांबूची निर्मिती करता येणे शक्य असून, या वृक्षापासून वर्षाला २ लाख ५० हजार रुपयांपर्यंत उत्पादन घेता येते. जालना जिल्ह्याचे वनक्षेत्र अवघे १.२७ टक्के एवढे असून, जिल्ह्यात अधिकाधिक वृक्षांची लागवड करण्याची गरज आहे. जालना जिल्ह्यातून गोदावरी, दुधना केळणा, गिरिजा अशा नद्या वाहतात. या नद्यांच्या काठावर बांबू या वृक्षाची लागवड करण्याबरोबरच शासनाच्या पोखरा योजनेंतर्गतही बांबू वृक्षाची अधिकाधिक लागवड करून जिल्ह्याचे वनक्षेत्र वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही यामुळे नक्कीच भर पडणार असल्याचे सांगत त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे म्हणाले, बांबू वृक्ष लागवड ही शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडण्याबरोबरच पर्यावरणाला अधिक फायदेशीर आहे. जालना जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, प्रत्येक तालुक्यात दर रविवारी एका एकर क्षेत्रावर वृक्ष लागवड करण्यात येते. येणाऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील नदीकाठावर असलेल्या गायरान जमिनीवर बांबू वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात यावे. या कार्यक्रमाकडे केवळ शासकीय कार्यक्रम म्हणून न पाहता बांबू वृक्ष लागवड हे एक मॉडेल व्हावे, या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील प्रत्येक गावातून होतकरू अशा शेतकऱ्यांना एकत्रित करत या वृक्ष लागवडीचे महत्व त्यांना पटवून द्यावे, असे ते म्हणाले.

बांबू लागवड मार्गदर्शक संजीव करपे यांनी बांबूपासून विविध प्रकारच्या वस्तूंबरोबरच इमारतीचीही कशा प्रकारे उभारणी करण्यात येते, याची पॉवरपॉईंटच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली.

Web Title: Planting a bamboo tree is a need of the hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.