"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 16:29 IST2025-11-20T16:28:32+5:302025-11-20T16:29:49+5:30
"घातपाताच्या कटातील सूत्रधाराला वाचवताय!"; जरांगे पाटलांचा फडणवीस-पवारांवर थेट हल्ला

"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
वडीगोद्री (जालना): "माझ्या हत्येच्या कटातील मुख्य सूत्रधाराला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पूर्ण ताकद लावत आहेत," असा अत्यंत गंभीर आरोप करत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवरचा 'पूर्ण विश्वास उडाल्याचे' जाहीर केले आहे. त्यांनी गुरुवारी (२० नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी बोलताना, आपण दिलेले पोलीस संरक्षण नाकारल्याचे स्पष्ट केले.
जरांगे पाटील यांनी बुधवारी पोलीस अधीक्षकांना अर्ज देऊन पोलीस संरक्षण काढण्याची मागणी केली होती. गुरुवारी त्यांनी याची अंमलबजावणी केली. "आम्ही काल अर्ज दिला आणि अंगरक्षकांना (पोलिसांना) सांगितले, तुम्ही सोबत येऊ नका. आज पोलीस सोबत येऊ दिले नाही. तुम्ही आतापर्यंत सेवा दिली, त्याबद्दल सर्व पोलीस बांधवांचे मनापासून सन्मान करतो," असे भावनिक विधान करत त्यांनी पोलिसांना गाडीतही बसू दिले नाही आणि सोबतही घेतले नाही. "जीवन जगत असताना खोटं वागायचं नाही, त्यामुळे आम्हाला सरकारने दिलेलं पोलीस संरक्षण नको, कारण आमचा सरकारवरचा पूर्ण विश्वास उडाला आहे," असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
धनंजय मुंडेंसह फडणवीस-पवारांवर थेट निशाणा
जरांगे पाटील यांनी यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर आपला घातपात करण्याचा कट रचल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करत, फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर तोफ डागली. "एवढा मोठा घातपाताचा कट धनंजय मुंडेकडून होतोय, त्याला वाचवायचं काम अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस करत आहेत." असे म्हणत जरांगे यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला पाठबळ दिल्याबद्दल अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना १००% जबाबदार धरले आहे.
आता आम्ही आमचं बघू...
"माझ्या हत्येच्या कटातील मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे आहे, आता आम्ही आमचं बघू. आता मैदान मोकळं आहे, येऊ द्या त्याचे कोण कोण यायचं ते. बघू आम्ही. आता अंगावर आल्यावर वापस कसे जातात! आता जे आरोपी पकडलेले आहेत, ते स्पष्टपणे त्याला (धनंजय मुंडे) बोललेले आहेत. फोनवरती सगळे कट रचलेले आहेत. तो कोण बडा आहे, तो अजून धरलेला नाहीये. हे सगळं मोठं षडयंत्र रचण्यात आलं होतं," असे जरांगे म्हणाले. "माजी मंत्री आणि आमदार आहे म्हणून तुम्ही सोडून देणार का? नसता त्याला चौकशीसाठी पाठवलं असतं, त्याला अटक केली असती," असा सवाल त्यांनी केला.