जालन्यात समोरासमोर धडकेत दोन दुचाकींचा चक्काचूर; तिघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 11:32 IST2026-04-27T11:30:05+5:302026-04-27T11:32:35+5:30
गाव अवघ्या एक किमीवर असतानाच झाला भीषण अपघात; भोकरदन तालुक्यातील तीन तरुण ठार.

जालन्यात समोरासमोर धडकेत दोन दुचाकींचा चक्काचूर; तिघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
भोकरदन (जि. जालना): तालुक्यातील नळणी ते राजूर रस्त्यावर रविवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात सुभाष साठे, विलास साठे आणि अनिल बोराडे या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. धडक इतकी भीषण होती की दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
गाव जवळ आले अन् घात झाला
नळणी येथील सुभाष अतुल साठे (४०) आणि विलास साहेबराव साठे (३८) हे दोघे राजूरहून आपल्या गावी नळणीला परतत होते. गाव अवघे एक किलोमीटर अंतरावर असतानाच, समोरून येणाऱ्या अनिल संतोष बोराडे (२०) आणि समाधान सर्जेराव कोरके (२२) यांच्या दुचाकीशी त्यांची जोरात धडक झाली. या धडकेत सुभाष, विलास आणि अनिल या तिघांचा जागीच प्राण गेला.
एकाची प्रकृती चिंताजनक
या अपघातात समाधान सर्जेराव कोरके हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला नळणी येथील ग्रामस्थांनी तातडीने जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच भोकरदन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.