"भारताकडून मदत आलीय...." इराणची पोस्ट अन् काही तासांत डिलिटही केली, काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 17:26 IST2026-03-18T17:25:37+5:302026-03-18T17:26:18+5:30
भारतातील इराणी दूतावासानेही युद्धग्रस्त इराणला मदत करण्यासाठी देणगी मोहीम सुरू केली आहे

"भारताकडून मदत आलीय...." इराणची पोस्ट अन् काही तासांत डिलिटही केली, काय आहे प्रकरण?
नवी दिल्ली - अमेरिका इस्रायलविरुद्ध इराण युद्धात भारताकडूनइराणला पाठवण्यात आलेल्या वैद्यकीय मदतीसाठी आभार मानणारी पोस्ट करण्यात आली होती परंतु काही तासांतच ही पोस्ट डिलिट करण्यात आली. सोशल मीडियावर भारतातील इराणी दूतावासाने ही पोस्ट केली होती. त्यात भारतातील लोकांकडून वैद्यकीय मदतीची पहिली खेप इराणला पोहचवल्याबद्दल आभार मानले होते परंतु आता ही पोस्ट डिलिट करण्यात आली आहे. भारताकडून सध्या इराणला कुठलीही मदत पाठवण्यात आली नाही असं सांगण्यात येत आहे.
माहितीनुसार, आतापर्यंत भारत सरकारकडून इराणला कुठलीही मदत पाठवण्यात आली नाही परंतु भारतातील इराणी दूतावासाने त्यांच्या पोस्टमध्ये ही मदत इराणी रेड क्रिसेंट सोसायटीला सोपवल्याचे म्हटले. या पोस्टमधून दूतावासाने भारतातील लोकांचे आभार मानले. भारतातील प्रतिष्ठित लोकांकडून वैद्यकीय साहित्यांची पहिली खेप इराणला पाठवण्यात आली आहे. आम्ही भारताच्या उदार जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो. या पोस्टसोबत एक व्हिडिओही पोस्ट केला होता. ज्यात इराणला पाठवलेले मेडिकल साहित्य दिसत होते. भारताच्या जनतेकडून इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या रेड क्रेसेंट सोसायटीला वैद्यकीय मदत करण्यात आली असंही त्यावर उल्लेख होता.
Embassy of the Islamic Republic of Iran in India says, "The first shipment of medical aid from the esteemed people of India has been delivered to the Iranian Red Crescent Society. We sincerely thank the kind people of India."
— ANI (@ANI) March 18, 2026
(Video source: Embassy of the Islamic Republic of… pic.twitter.com/6LobbWCdmY
तर भारतातील इराणी दूतावासानेही युद्धग्रस्त इराणला मदत करण्यासाठी देणगी मोहीम सुरू केली आहे. दूतावासाने इन्स्टाग्रामवर एक संदेश पोस्ट करून भारतीयांनी दिलेल्या देणग्यांबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये दूतावासाने खातेदाराचे नाव, खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड देखील दिला आहे, जेणेकरून लोक आपली देणगी पाठवू शकतील.
— Iran in India (@Iran_in_India) March 17, 2026
इराणचं मोठं नुकसान
अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ले केले, ज्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते मारले गेले. अलीकडे इस्रायली हल्ल्यांमध्ये खामेनेईंच्या निधनानंतर इराणमधील सर्वात शक्तिशाली नेते मानले जाणारे अली लारीजानी हे देखील मारले गेले. जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रांमधील इराणचे राजदूत अली बहरेनी यांच्या म्हणण्यांनुसार युद्ध सुरू झाल्यापासून इराणमध्ये १,३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ७,००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आरोग्य सुविधांवरील १८ हल्ल्यांची पुष्टी केली असून आठ वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची नोंद केली आहे.