अग्नितांडव! कराचीतील शॉपिंग मॉलला भीषण आग; २६ जणांचा मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 07:56 IST2026-01-20T07:55:44+5:302026-01-20T07:56:25+5:30
पाकिस्तानमधील कराची शहरात एम.ए. जिन्ना रोडवर असलेल्या 'गुल प्लाझा' या प्रसिद्ध शॉपिंग मॉलला भीषण आग लागली आहे.

अग्नितांडव! कराचीतील शॉपिंग मॉलला भीषण आग; २६ जणांचा मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता
पाकिस्तानमधील कराची शहरात एम.ए. जिन्ना रोडवर असलेल्या 'गुल प्लाझा' या प्रसिद्ध शॉपिंग मॉलला भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. या दुर्घटनेत ८१ लोक अजूनही बेपत्ता असून शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. आगीमुळे या बहुमंजिली व्यावसायिक इमारतीचं प्रचंड नुकसान झालं. ही इमारत आता अत्यंत असुरक्षित घोषित करण्यात आली आहे.
१७ जानेवारी रोजी रात्री १० च्या सुमारास आग लागली होती. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला ३४ तासांहून अधिक काळ लागला. आग विझली असली तरी ढिगारा उपसण्याचे आणि बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचे काम अजूनही सुरू आहे. इमारत कोसळण्याची शक्यता लक्षात घेता, लष्कर, रेंजर्स आणि नागरी प्रशासनाच्या पथकांसह अभियंते इमारतीच्या संरचनेची पाहणी करत आहेत.
आतापर्यंत २६ मृतदेह सापडले
डीआयजी (दक्षिण) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यापैकी सहा जणांची ओळख पटली असून, उर्वरित मृतांची ओळख पटवण्यासाठी 'डीएनए' (DNA) चाचणी केली जाणार आहे. सुरुवातीला बेपत्ता व्यक्तींची संख्या ६९ सांगण्यात आली होती, मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील हेल्प डेस्ककडे आलेल्या तक्रारींनुसार ही संख्या आता ८१ वर पोहोचली आहे.
डीएनए नमुने घेण्याचे काम सुरू
मृतांची ओळख पटवण्यासाठी आतापर्यंत १८ कुटुंबीयांनी आपले डीएनए नमुने दिले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून गुल प्लाझा आणि शेजारील राम्पा प्लाझाचे सर्व प्रवेशद्वार सील करण्यात आले असून केवळ अधिकृत बचावकर्त्यांनाच आत जाण्याची परवानगी दिली जात आहे.
मदतकार्य सुरूच
बचाव पथके इमारतीच्या मागील बाजूने आत प्रवेश करत आहेत, तर ढिगारा हटवण्यासाठी अवजड यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. प्रशासनाने बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हेल्पलाइनशी संपर्कात राहण्याचे आवाहन केलं आहे.
या दुर्घटनेतून वाचलेल्यांनी इमारतीमधील सुरक्षेच्या त्रुटींवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. जुबैर नावाच्या एका व्यक्तीने सांगितलं की, "गुल प्लाझामध्ये एकूण २६ दरवाजे आहेत, परंतु रात्री १० नंतर त्यातील २४ दरवाजे बंद केले जात असत. आग लागली तेव्हा धूर आणि अंधार इतका होता की बाहेर पडण्याचा रस्ताच दिसत नव्हता." त्याच्या म्हणण्यानुसार, आग लागली तेव्हा त्याच्या दुकानात २० हून अधिक लोक उपस्थित होते.