भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 09:32 IST2026-05-09T09:30:57+5:302026-05-09T09:32:06+5:30
भारत-पाक संघर्षात चीनचा पर्दाफाश! 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान चिनी इंजिनिअर्स पाकिस्तानात तळ ठोकून होते.

भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षाबाबत चीनने अखेर एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी कबुली दिली आहे. या युद्धादरम्यान आपण पाकिस्तानला जमिनस्तरावर तांत्रिक सहाय्य दिले होते, हे चीनने पहिल्यांदाच अधिकृतपणे मान्य केले आहे. चीनच्या सरकारी प्रसारक 'CCTV'वर प्रसारित झालेल्या एका मुलाखतीत चिनी इंजिनिअर्सनी हा खुलासा केला असून, यामुळे भारताच्या दाव्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
चिनी इंजिनिअर्स थेट युद्धभूमीच्या तळावर!
'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायनाच्या इंजिनिअर्सनी सांगितले की, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान ते पाकिस्तानच्या एअरबेसवर उपस्थित होते. इंजिनिअर झांग हेंग यांनी सांगितले की, "मे महिन्यातील ५० अंश सेल्सिअस तापमान आणि सतत वाजत राहणारे एअर-रेड सायरन अशा कठीण परिस्थितीत आमची टीम तिथे तैनात होती. आमचे मुख्य काम चिनी बनावटीची युद्धसामग्री पूर्ण क्षमतेने काम करेल, याची खात्री करणे हे होते."
J-10CE फायटर जेटचे 'कनेक्शन'
पाकिस्तानच्या ताफ्यात असलेली चिनी बनावटीची 'J-10CE' ही आधुनिक लढाऊ विमाने या संघर्षात महत्त्वाची ठरली होती. चिनी इंजिनिअर्सनी या विमानांना 'आपल्या मुलाप्रमाणे' असल्याचे सांगत, युद्धाच्या वेळी त्यांच्या कामगिरीवर पूर्ण विश्वास असल्याचे म्हटले. चीनने २०१५ पासून पाकिस्तानला तब्बल ८.२ अब्ज डॉलर्सची शस्त्रे विकली आहेत. विशेष म्हणजे, चीन आपल्या एकूण शस्त्र निर्यातीपैकी ६३ टक्के शस्त्रे एकट्या पाकिस्तानला पुरवतो.
काय होते 'ऑपरेशन सिंदूर'?
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात भारताचे २६ नागरिक शहीद झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले. भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले होते. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबासारख्या संघटनांचे १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले होते.
पाकिस्तान म्हणजे चीनची लाईव्ह लॅब!
भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वीच इशारा दिला होता की, पाकिस्तानच्या लष्कराकडील ८१ टक्के शस्त्रे ही चिनी बनावटीची आहेत. चीन पाकिस्तानचा वापर एका 'लाईव्ह लॅब'सारखा करत आहे, जिथे ते आपल्या शस्त्रास्त्रांची युद्धभूमीवरील चाचणी घेतात. आता तर पाकिस्तान चीनकडून ४० 'J-35' स्टेल्थ फायटर जेट घेण्याच्या तयारीत आहे.
चीनच्या या कबुलीमुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, भारत यावर काय अधिकृत प्रतिक्रिया देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनीही यापूर्वीच भारतासाठी चीन हा 'प्राथमिक शत्रू' असल्याचे म्हटले होते, जे आता चिनी इंजिनिअर्सच्या खुलाशानंतर पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.