इराण युद्ध होणार, हे ड्रॅगनला आधीच माहीत होतं? जमा केला तेलाचा प्रचंड स्टॉक! किती वाढवला साठा? जाणून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 11:41 IST2026-03-11T11:41:19+5:302026-03-11T11:41:35+5:30
चीन गेल्या एका वर्षापासून सातत्याने आपला धोरणात्मक (Strategic) साठा जमा करत आहे. विशेष म्हणजे, चीनमध्ये देशांतर्गत स्तरावर तेलाचा वापर कमी होत असतानाही बीजिंगने तेल साठवण्यावर भर दिला आहे.

इराण युद्ध होणार, हे ड्रॅगनला आधीच माहीत होतं? जमा केला तेलाचा प्रचंड स्टॉक! किती वाढवला साठा? जाणून थक्क व्हाल
पश्चिम आशियामध्ये ११ दिवसांनंतरही युद्ध सुरूच आहे. याचा परिणाम संपूर्ण जगावरच बघायला मिळत आहे. मात्र, हे युद्ध सुरू होण्यापूर्वीच चीनने वाढत्या भू-राजकीय तणावापासून वाचण्यासाठी आपली रणनीती आखली होती. या रणनीतीचा भाग म्हणून चीनने वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत कच्च्या तेलाची खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढवली. बीजिंगने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या सीमा शुल्क आकडेवारीनुसार, चीनने गेल्या वर्षीच्या तुलनेत, यावर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये १५.८ टक्के अधिक तेल आयात केले आहे.
एका वर्षापासून वाढवतोय धोरणात्मक साठा -
चीन गेल्या एका वर्षापासून सातत्याने आपला धोरणात्मक (Strategic) साठा जमा करत आहे. विशेष म्हणजे, चीनमध्ये देशांतर्गत स्तरावर तेलाचा वापर कमी होत असतानाही बीजिंगने तेल साठवण्यावर भर दिला आहे. आता पश्चिम आशियातील बिघडलेली परिस्थिती पाहता, हा साठवलेला तेल साठा चीनसाठी महत्त्वाचा ठरेल, असे बोलले जात आहे.
चीनचा मोर्चा आता रशियाकडे -
महत्वाचे म्हणजे, चीनसाठी कच्च्या तेलाचे सर्वात स्वस्त स्रोत असलेल्या व्हेनेझुएला आणि इराण या दोन्ही देशांना अमेरिकेने लक्ष्य केले. या दोन्ही देशांमधील नेतृत्व बदलामुळे चीनने केलेल्या जुन्या करारांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या बदलत्या समीकरणामुळे चीनने आपला मोर्चा आता रशियाकडे वळवला आहे.
रशियन तेलाच्या खरेदीत वाढ:
या वर्षात चीनने रशियन तेलाच्या खरेदीतही लक्षणीय वाढ केली आहे. भारताने अमेरिकेसोबतच्या व्यापारी कराराच्या चर्चेदरम्यान रशियाकडून होणारी तेल खरेदी कमी केली होती, ज्याचा फायदा घेत चीनने रशियाकडून आपली आयात वाढवून भविष्यातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी पावले उचलली आहेत.