मिडल-ईस्ट युद्धात अडकलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा, UAE नं विशेष विमानांची केली व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 21:32 IST2026-03-02T21:31:49+5:302026-03-02T21:32:48+5:30
या संकटामुळे इंडोनेशियाचे ५८ हजारांहून अधिक उमराह यात्री सौदी अरेबियात अडकले आहेत. जर्मनीचे ३० हजार पर्यटक क्रूझ जहाजांवर आणि हॉटेल्समध्ये अडकून पडले आहेत. ब्रिटन आणि चेक रिपब्लिकसह अनेक देश आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. एअर इंडियासह एअर फ्रान्स आणि केएलएम सारख्या मोठ्या कंपन्यांनी मध्य पूर्वेतील उड्डाणे रद्द केली आहेत.

मिडल-ईस्ट युद्धात अडकलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा, UAE नं विशेष विमानांची केली व्यवस्था
संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीने युद्धामुळे अडकलेल्या प्रवाशांसाठी सोमवारी एक मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे. यानुसार, देशातील प्रमुख विमानतळांवरून विशेष विमाने (Special Flights) चालवली जात आहेत, जेणेकरून संघर्षामुळे अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढणे आणि त्यांची देशात परत पाठवणे शक्य होईल.
युद्धाचा विमान सेवेवर परिणाम -
अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे पश्चिम आशियातील हवाई क्षेत्र बंद करावे लागल्याने दुबई आणि अबू धाबीसह अनेक विमानतळांवरील हजारो उड्डाणे प्रभावित झाली. जगभरातील लाखो प्रवाशांना याचा मोठा फटका बसला. इराणने प्रत्युत्तरादाखल केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात दुबई, अबू धाबी आणि दोहा विमानतळांचे नुकसान झाले आहे. या तणावामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अनेक देशांनी आपल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला आहे.
प्रमुख विमानतळ बंद -
इराणच्या थेट हल्ल्यांमुळे खाडी क्षेत्रातील प्रमुख हवाई वाहतूक ठप्प झाली आहे. 'एमिरेट्स'ने सोमवार संध्याकाळपासून मर्यादित उड्डाणे सुरू केली आहेत, तर 'एतिहाद'ने मॉस्को, ॲमस्टरडॅम आणि पॅरिससाठी विशेष विमाने चालवली आहेत. मात्र, 'कतार एअरवेज'ने आपली उड्डाणे अद्याप स्थगित ठेवली आहेत. ते मंगळवारी सकाली अपडेट देणार आहेत.
प्रवाशांचे प्रचंड हाल, हजारो प्रवासी अडकले... -