बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; २३ वर्षांच्या चंचल भौमिकला गॅरेजमध्ये जिवंत जाळलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 09:55 IST2026-01-25T09:54:58+5:302026-01-25T09:55:50+5:30
बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाविरुद्ध हिंसेची आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे.

फोटो - आजतक
बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाविरुद्ध हिंसेची आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे. नरसिंदी पोलीस लाईनला लागून असलेल्या मशीद मार्केट परिसरात २३ वर्षीय हिंदू तरुण चंचल चंद्र भौमिक याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. चंचलला गॅरेजच्या आतच जिवंत जाळण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
मृत चंचल चंद्र भौमिक हा कुमिल्ला जिल्ह्यातील लक्ष्मीपूर गावचा रहिवासी होता. तो गेल्या अनेक वर्षांपासून नरसिंदी येथील एका गॅरेजमध्ये काम करत होता आणि कामानिमित्त तिथेच राहत होता. चंचल आपल्या कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता.
प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी उशिरा रात्री चंचल गॅरेजच्या आत झोपला असताना दुकानाच्या बाहेरील शटरवर पेट्रोल ओतून आग लावण्यात आली. आग वेगाने संपूर्ण गॅरेजमध्ये पसरली. घटनेशी संबंधित एका व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती दुकानाच्या बाहेर आग लावते, त्यानंतर आग वेगाने आत पसरते.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केलं. नरसिंदी अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. आग विझवल्यानंतर गॅरेजच्या आतून चंचल चंद्र भौमिक याचा जळालेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, चंचल बराच वेळ आगीत होरपळत होता आणि त्याचा मृत्यू झाला.
चंचलच्या कुटुंबीयांनी ही घटना पूर्णपणे पूर्वनियोजित हत्या असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण असून अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षेबाबत नवीन चिंता निर्माण झाली आहे.
पोलिसांनी सांगितलं की, घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे स्थानिक हिंदू नेत्यांनी या निर्घृण हत्येचा तीव्र निषेध केला आहे. दोषींची तातडीने ओळख पटवून त्यांना अटक करण्याची मागणी करत, प्रशासनाने परिसरात अल्पसंख्याक समुदायाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी पावलं उचलावीत, असं आवाहन केलं आहे.