अमेरिकेचा अजब न्याय! ज्या देशाला आपलं मानलं, तिथेच ५ दशकांनंतर ठरली 'परकी'; एका महिलेची हृदयद्रावक कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 16:41 IST2026-02-22T16:39:46+5:302026-02-22T16:41:13+5:30
इराणच्या अनाथालयातून दत्तक घेतलेल्या एका ४ वर्षांच्या चिमुकलीला आता वयाच्या ५६ व्या वर्षी अमेरिकेतून हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

अमेरिकेचा अजब न्याय! ज्या देशाला आपलं मानलं, तिथेच ५ दशकांनंतर ठरली 'परकी'; एका महिलेची हृदयद्रावक कहाणी
ज्या देशाला आपले मानले, जिथे ५२ वर्षे काढली आणि ज्या संस्कृतीत लहानाची मोठी झाली, आता तोच देश तिला 'परका' मानू लागला आहे. १९७० च्या दशकात एका अमेरिकन सैनिकाने इराणच्या अनाथालयातून दत्तक घेतलेल्या एका ४ वर्षांच्या चिमुकलीला आता वयाच्या ५६ व्या वर्षी अमेरिकेतून हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या कडक इमिग्रेशन नियमांमुळे या महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून, तिला पुन्हा इराणला पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
४ थ्या वर्षी इराण ते अमेरिका प्रवास
१९७० च्या दशकात एका अमेरिकन युद्धवीराने इराणमधील एका अनाथालयातून या चिमुकलीला दत्तक घेतले होते. तिला अमेरिकेत आणले आणि एका ख्रिस्ती कुटुंबात तिचे संगोपन झाले. आज ती महिला स्वतःला पूर्णपणे अमेरिकन मानते. तिचे कॅलिफोर्नियात स्वतःचे घर आहे, ती नियमित टॅक्स भरते आणि तिची गुन्हेगारी पार्श्वभूमीही नाही. तरीही, केवळ कागदपत्रांच्या तांत्रिक त्रुटीमुळे तिला आता देश सोडावा लागणार आहे.
व्हिसा संपल्याचं कारण देत बजावली नोटीस
नुकतेच अमेरिकन गृह सुरक्षा विभागाने या महिलेला एक पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, मार्च १९७४ मध्ये तिचा व्हिसा संपला होता आणि त्यानंतर ती बेकायदेशीररीत्या अमेरिकेत राहिली. प्रत्यक्षात, तेव्हा ती केवळ ४ वर्षांची होती. तिच्या अमेरिकन पालकांनी तिला नागरिकत्व मिळवून देण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे हा तांत्रिक पेच निर्माण झाला आहे. २००८ पासून ती आपली ही कायदेशीर स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र आता थेट हद्दपारीचे आदेश आल्याने ती सुन्न झाली आहे.
इराणला परतणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण?
या महिलेसाठी सर्वात मोठी भीती म्हणजे इराणमध्ये तिची होणारी सुरक्षा. "मी एक ख्रिस्ती आहे आणि एका अमेरिकन अधिकाऱ्याची मुलगी आहे. अशा स्थितीत इराणमध्ये मला जीव धोक्यात घालून राहावे लागेल," असे तिने हतबलतेने सांगितले. सध्या अमेरिका आणि इराणमध्ये युद्धसदृश परिस्थिती असताना, एका अनाथ महिलेला अशा आगीत झोकून देणे किती योग्य आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
हजारो मुलांचे भवितव्य अंधारात
हे प्रकरण केवळ एका महिलेपुरते मर्यादित नाही. अमेरिकन पालकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरून दत्तक घेतलेल्या हजारो मुलांसोबत अशीच समस्या उद्भवत आहे. जर पालकांनी नागरिकत्वाची प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर या मुलांना आता कोणत्याही क्षणी देश सोडावा लागू शकतो. ट्रम्प प्रशासनाच्या 'मास डिपोर्टेशन' मोहिमेत आता निर्दोष आणि कष्टाळू लोकही भरडले जात असल्याचे हे जिवंत उदाहरण आहे.