Hingoli Accident: वसमतजवळ अपघातात दोन दुचाकींचा चक्काचूर; २ ठार, दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 16:41 IST2026-04-23T16:41:09+5:302026-04-23T16:41:36+5:30
नांदेड आणि कळमनुरीच्या तरुणांचा जागीच मृत्यू

Hingoli Accident: वसमतजवळ अपघातात दोन दुचाकींचा चक्काचूर; २ ठार, दोघे गंभीर जखमी
वसमत (जि. हिंगोली): वसमत-परभणी महामार्गावरील तेलगाव फाट्याजवळ गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास झालेल्या दोन दुचाकींच्या भीषण अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात नितीन नागोराव नरवाडे (२१, रा. नांदुसा, जि. नांदेड) आणि सिराज शेख उमर (४२, रा. बऊर, ता. कळमनुरी) या दोघांचा जागीच अंत झाला. धडक इतकी प्रचंड होती की, दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
दोन जण गंभीर जखमी
या अपघातात सिराज यांच्या पत्नी गौसाबी शेख सिराज (४०) आणि नितीन यांचा साथीदार कपिल हाटकर (३०) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर स्थानिक नागरिक मुखीद अफजल, सय्यद अतिफ कलंदर व इतरांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमींना तातडीने वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे.
अपघाताचा थरार
एक दुचाकी वसमतच्या दिशेने येत होती, तर दुसरी परभणीकडे जात असताना तेलगाव फाट्याजवळ हा भीषण अपघात घडला. धडक बसताच दोन्ही दुचाकींवरील चौघेही जण रस्त्यावर दूरवर फेकले गेले. हाटा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.