पँटच्या मागच्या खिशात पाकीट ठेवणं मोठं धोक्याचं, असं करणं किती घातक रिसर्चमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 11:24 IST2026-05-08T11:24:24+5:302026-05-08T11:24:52+5:30
Wallet in Back Pocket : जेव्हा मागच्या खिशात पाकीट ठेवून तासंतास आपण बसतो, तेव्हा ही सवय हळूहळू आपलं मोठं नुकसान करत असते.

पँटच्या मागच्या खिशात पाकीट ठेवणं मोठं धोक्याचं, असं करणं किती घातक रिसर्चमधून खुलासा
Wallet in Back Pocket : वॉलेट म्हणजे पाकीट वापरणं अनेक दृष्टीने फायदेशीर असतं. पुरूष पाकिटात फक्त पैसे ठेवत नाही, तर त्यांचे आयडी, एटीएम कार्ड, महत्वाची कागदपत्रे देखील ठेवतात. सामान्यपणे जास्तीत जास्त पुरूष हे पँटच्या मागच्या खिशात पाकीट ठेवतात. दिवसभर पाकीट मागच्या खिशात असतं. धावपळ केली, उठ-बस केली तरी पाकीट खिशातच असतं. हा एक सवयीचा भाग झालेला असतो. पण अनेकांना या गोष्टीची जराही कल्पना नसते की, पँटच्या मागच्या खिशात पाकीट ठेवल्याने शरीराचं खूप मोठं नुकसान होतं. जेव्हा मागच्या खिशात पाकीट ठेवून तासंतास आपण बसतो, तेव्हा ही सवय हळूहळू आपलं मोठं नुकसान करत असते.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित एका रिपोर्टमध्ये 'फॅट वॉलेट सिंड्रोम' (Fat Wallet Syndrome) बाबत माहिती देण्यात आलीये. या रिपोर्टचा उद्देश लोकांना पँटच्या मागच्या खिशात पाकीट ठेवणाऱ्या लोकांना जागरूक करणं हा आहे.
फॅट वॉलेट सिंड्रोम काय आहे?
जेव्हा आपण पाकीट पँटच्या मागच्या खिशात ठेवतो आणि त्यावर बराच वेळ बसतो, तेव्हा आपलं पेल्विस असंतुलित होतं. या असंतुलनामुळे मणक्यामध्ये आणि त्यासंबंधी काही महत्वाच्या नसांवर दबाव निर्माण होतो. ज्यामुळे तणाव जाणवतो, वेदना होतात. इतकंच नाही तर पाय सु्न्न होणे असाही त्रास होतो. या रिसर्चमधून इशारा देण्यात आलाय की, ही समस्या केवळ खतरनाक नाही तर पुढे जाऊन आणखी गंभीर होऊ शकते.

काय काय समस्या होतात?
- आपलं पाकीट जास्त जाड असेल किंवा असमान आकाराचं असेल तर याने कंबरेच्या भागात असंतुलन होतं. ज्यामुळे मणक्याची अलायनमेंट बिघडू शकते.
- मागच्या खिशात पाकीट ठेवून जास्त बसल्याने सिआटिक नर्व्ह दबू शकते, ज्यामुळे वेदना किंवा सुन्नपणा जाणवू शकतो.
- जास्त वेळ या चुकीच्या पद्धतीने बसून राहिल्याने आजूबाजूच्या स्नायूंवर दबाव पडतो. ज्यामुळे तणाव वाढतो.
काय काळजी घ्यावी?
- जर आपण बसले असाल किंवा ड्राइव्ह करत असाल तर आपलं पाकीट मागच्या खिशातून काढून ठेवा. पाकीट बॅगमध्ये किंवा टेबलवर ठेवू शकता.
- पाकिटात कार्ड्स, पैसे कमी ठेवा, जेणेकरून ते जाड होणार नाही.
- दुसरा पर्याय म्हणजे पाकीट समोरच्या खिशात ठेवू शकता. असं केल्यास चोरीचा धोकाही कमी होतो आणि विनाकारण पाठ, कंबर आणि पायांवर दबावही पडणार नाही.