Liver Health: केवळ मद्यपानच नाही, तर 'या' गोष्टीही लिव्हर खराब करण्यास कारणीभूत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 13:42 IST2026-04-19T13:39:47+5:302026-04-19T13:42:18+5:30
अनेकदा आपल्याला वाटते की यकृताचे आजार फक्त मद्यपानामुळे होतात. पण सध्या नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचा धोका वेगाने वाढत आहे. मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

Liver Health: केवळ मद्यपानच नाही, तर 'या' गोष्टीही लिव्हर खराब करण्यास कारणीभूत!
लोकमत न्यूज नेटवर्क
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, लिव्हर केवळ दारू पिणाऱ्यांचेच नाही तर न पिणाऱ्यांचेही खराब होऊ शकते. त्याला वैद्यकीय भाषेत नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) असे म्हणतात. या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. अनेकजण आरोग्य तपासणी करतेवेळी त्यांना चाचणीमध्ये लिव्हर (यकृत) फॅटी असल्याचे निदान होते. दारू न पिताही लिव्हर फॅटी कसे काय, हा प्रश्न अनेकांना पडतो.
मेटाबॉलिक सिंड्रोममुळे रुग्णांना लिव्हरचा आजार
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, दारू न पिणाऱ्या अनेक व्यक्तींना फॅटी लिव्हर असण्याची शक्यता असते. मेटाबॉलिक सिंड्रोममुळे शक्यतो रुग्णांना लिव्हरचा आजार होत असतो.मेटाबोलिक सिंड्रोम म्हणजे विविध आजारांचा समूह, हा सिंड्रोम असलेल्या व्यक्तींना मधुमेह, उच्च कोलेस्ट्रेरॉल, लठ्ठपणा, हृदयविकार, उच्च रक्तदाब असे आजार असतात. यकृत हा अवयव असून शरीरातील उजव्या बरगड्यांमध्ये असतो. वैद्यकीय क्षेत्रातील सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे या आजाराचे फॅटी लिव्हर किंवा त्या पुढील आजारांच्या पायऱ्यांचे निदान करणे सहज शक्य आहे. लिव्हर फायग्नोसिस झाला आहे, की नाही हे तपासण्यासाठी सोनोग्राफीसारखीच 'फायब्रोस्कॅन' ही तपासणी मोठ्या रुग्णालयात उपलब्ध आहे.
पचनसंस्थेच्या क्रियांत मोठी भूमिका
चयापचय आणि पचनसंस्थेतील सर्व क्रियांमध्ये लिव्हर मोठी भूमिका बजावत असते. शेकडोंपेक्षा अधिक कार्ये या अवयवामार्फतच केली जातात. त्याकरिता लिव्हरच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याच्या कार्यात बिघाड झाल्यास परिणाम शरीरावर दिसून येतो.
सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आजाराचे निदान करणे शक्य!
त्यावरून औषधोपचाराने या आजारावर २ नियंत्रण ठेवणे शक्य आहे. मात्र, सिरॉसिस झाल्यानंतर मोठा काळ औषधोपचार आणि पथ्यपाणी पाळण्यात जातो. अनेक वेळा मग डॉक्टरांच्या नियमित फेऱ्या व चाचण्या कराव्या लागतात. कार्य थांबल्यास मग यकृताच्या प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसतो.