Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 12:04 IST2026-05-10T12:01:39+5:302026-05-10T12:04:40+5:30
आपल्या शरीरातील वेगवेगळे अवयव अधिक कार्यक्षम होतात. पण ही फळे कशी खावीत, केव्हा खावीत, किती खावीत आणि कोणती खावीत याची फारशी कल्पना आपल्याला नसते.

Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
-डॉ. अरविंद देशमुख, मायक्रोबायोलॉजिस्ट
रोजच्या आहाराशिवाय फळे खाणे हे निरोगी आयुष्यासाठी गरजेचे आहे. फळांमुळे आपल्याला जीवनसत्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्साइइस योग्य प्रमाणात मिळतात. या घटकांची शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गरज असते. तसेच आपल्या शरीरातील वेगवेगळे अवयव अधिक कार्यक्षम होतात. पण ही फळे कशी खावीत, केव्हा खावीत, किती खावीत आणि कोणती खावीत याची फारशी कल्पना आपल्याला नसते. याविषयी जाणून घेऊ....
फळे खाताना काय घ्यावी काळजी?
बाजारातून फळे घरी आणल्यानंतर ताबडतोब खाऊ नयेत. आध ती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. फळे धुण्यासाठी थोडे कोमट पाणी वापरले तर योग्यच. फळे चकचकीत दिसावीत म्हणून मेणाचे कोटिंग केले जाते. ते शरीराला हानिकारक असते. चकचकीत दिसणाऱ्या फळे साल काढून खावीत.
बाजारात फळांवर माशा बसून रोगजंतू येऊ शकतात. फळे हाताळणारे कामगार निरोगी असतातच असे नसते. त्यांच्या हाताला जखमा असतील किंवा खोकला येत असेल तर हे जिवाणू फळांच्या सालीवर असू शकतात. फळांवर कीटकनाशकांचाही भरपूर वापर होतो. म्हणून साल काढलेली चांगली.
फळे घरी आणल्यानंतर एक-दोन दिवस चांगली राहतात. नंतर सामान्य तापमानात ती कुजण्यास सुरुवात होते. म्हणून थंड हवेत फळे साठवून ठेवणे गरजेचे असते. फळे कापलेली असतील तर फ्रिजमध्ये ठेवणे आवश्यक आहे.
फळे आंबट झाली असतील, रंग बदलला असेल किंवा लिबलिबित झाले असतील तर ती खाऊ नयेत. फळे कुजल्याची ही लक्षणे आहेत. रोग निर्माण करणारे जिवाणू त्यामध्ये असू शकतात. अशी फळे खाल्ल्याने गॅस्ट्रो, काविळ, अतिसारचे जीवाणू पसरू शकतात. तसेच स्टाफायलोकोकल विषबाधा आणि बोटुलिझम विषबाधा होऊ शकते.
एकाच प्रकारची फळे नेहमी खाऊ नयेत. कारण प्रत्येक फळांचे वैशिष्ट्य वेगळे असते. त्यामधील घटक वेगळे असतात. उदा. संत्री-मोसंबीत व्हिटॅमिन 'सी' असते ते रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. डाळिंब व पपईत व्हिटॅमिन 'ए' भरपूर प्रमाणात असते. ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी गरजेचे असते. केळी-चिकू हे भरपूर प्रमाणात ऊर्जा देतात.
फळे किती खावीत?
फळांची शरीराला गरज असते पण द्राक्षे, आंबा, चिकू, सीताफळ ही फळे जास्त प्रमाणात खाल्ल्यास मधुमेहाला निमंत्रण देऊ शकतात. म्हणून दररोज थोड्या प्रमाणात फळे खावीत. मधुमेहींनी डॉक्टरांना विचारूनच फळे खावीत.
फलाहार केव्हा करावा?
भरपेट जेवण झाल्यानंतर ताबडतोब फलाहार करू नये. कारण जेवणामुळे शरीरातील साखर वाढलेली असते व लगेच फलाहार केला तर साखर आणखी वाढते आणि स्वादुपिंडावर ताण येऊ शकतो. त्यामुळे फळे शक्यतो पोटात जागा असताना किंवा भूक लागलेली असताना मर्यादित प्रमाणात खावीत.
शक्यतो खा सेंद्रिय फळे...
आज-काल फळे पिकवण्यासाठी व आकर्षक दिसण्यासाठी वेगवेगळ्या कृत्रिम रंगांचा उपयोग होतो. उदा. टरबूज लाल दिसावे म्हणून एरिथ्रोसिन बी रसायनाचा उपयोग करतात. कॅल्शियम कार्बाइड, इथेलिन, ऑक्सिटोसिन ही रसायने फळे पिकवण्यासाठी वापरतात. या रसायनांमुळे पोटाचे विकार, उलट्या, अतिसार आणि दीर्घकाळ सेवनाने कर्करोगाचा धोका वाढतो. म्हणून शक्यतो सेंद्रिय खताचा वापर करून वाढवलेली फळे खाणे शरीराला हितकारक असते.