इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 12:47 IST2026-05-10T12:45:49+5:302026-05-10T12:47:07+5:30
अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपवण्यासाठी हालचाली वेगवान झाल्या आहेत. अमेरिकन परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी कतारच्या पंतप्रधानांशी मियामीमध्ये गुप्त भेट घेतली.

इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला प्रचंड तणाव आता निवळण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही देशांमधील संभाव्य शांतता कराराबाबत शनिवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी मियामीमध्ये कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल-थानी यांची भेट घेतली. या गुप्त बैठकीत इराणसोबतच्या शांतता करारावर सविस्तर चर्चा झाल्याचे वृत्त असून, यामुळे पश्चिम आशियातील युद्धाचे ढग विरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एका पानाचा 'MOU' अन् युद्धाला पूर्णविराम!
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इराण सध्या केवळ एका पानाच्या शांतता प्रस्तावावर चर्चा करत आहेत. हा एक सामंजस्य करार असून, याचा मुख्य उद्देश आधी सुरू असलेले युद्ध थांबवणे आणि त्यानंतर अणू कार्यक्रमासारख्या गंभीर मुद्द्यांवर सविस्तर चर्चा सुरू करणे हा आहे. हा करार झाल्यास मिडल इस्टमध्ये मोठा दिलासा मिळू शकतो.
कतार आणि पाकिस्तानची महत्त्वाची भूमिका
या शांतता प्रक्रियेत कतारची भूमिका अत्यंत कळीची ठरत आहे. युद्धाच्या सुरुवातीपासून पाकिस्तान अधिकृत मध्यस्थ म्हणून काम करत आहे, मात्र कतार पडद्यामागून अमेरिका आणि इराणला चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. कतारचे पंतप्रधान शुक्रवारी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वन्स यांना भेटले होते. त्यानंतर ते मायदेशी परतण्याऐवजी तातडीने मियामीला रवाना झाले, यावरूनच या चर्चेचे गांभीर्य लक्षात येते.
५ देशांचा 'शांती'साठी पुढाकार
केवळ कतारच नाही, तर पाकिस्तान, इजिप्त, तुर्किये आणि सौदी अरेबिया हे पाच देश मिळून अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मियामीतील बैठकीदरम्यान कतारच्या पंतप्रधानांनी सौदीच्या परराष्ट्र मंत्र्यांशीही फोनवर चर्चा केली. आता सर्वांचे लक्ष इराणच्या उत्तराकडे लागले आहे.
इराणच्या प्रतिसादाकडे जगाचे लक्ष
मध्यस्थी करणाऱ्या देशांच्या मते, दोन्ही देशांनी आता तणाव बाजूला ठेवून करारावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. शनिवारी दुपारपर्यंत अमेरिकेला इराणकडून अधिकृत उत्तराची प्रतीक्षा होती. जर इराणने या एका पानाच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला, तर लवकरच ऐतिहासिक शांतता करारावर स्वाक्षरी होऊ शकते.