फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 13:51 IST2026-05-10T13:51:06+5:302026-05-10T13:51:25+5:30
Uttarakhand News: हिंदू धर्मात पवित्र धर्मक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या हरिद्वार येथील हर की पैडी या तीर्थक्षेत्रातील व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कथितपणे एका महिलेच्या फोटोवर थुंकताना दिसत आहे.

फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
हिंदू धर्मात पवित्र धर्मक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या हरिद्वार येथील हर की पैडी या तीर्थक्षेत्रातील व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कथितपणे एका महिलेच्या फोटोवर थुंकताना दिसत आहे. त्यानंतर तो हा फोटो गंगा नदीत प्रवाहित करताना तसेच पिंडदान करताना दिसत आहे. या व्यक्तीने काही कारणामुळे त्याच्या जिवंत पत्नीचं प्रतिकात्मक पिंडदान केल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही. तसेच फोटोमध्ये दिसत असलेली महिला कोण आहे. तसेच या दोघांमध्ये काय संबंध होते, हेही स्पष्ट झालेलं नाही. मात्र या व्हिडीओवरून सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. काही युझर्सच्या म्हणण्यानुसार सदर इसम त्याच्या पत्नीच्या सततच्या रील बनवण्याच्या सवयीमुळे त्रस्त झाला होता. तसेच त्या रागातून त्याने हे कृत्य केलं. मात्र आतापर्यंत या दाव्याला दुजोरा मिळू शकलेला नाही.
हा व्हिडीओ हर की पैडी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच हा व्हिडीओ समोर आल्यापासून पुरोहित आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आध्यात्मिक केंद्र मानल्या जाणाऱ्या गंगा नदीच्या घाटांवर अशा प्रकारचं कृत्य करणं हे लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारं कृत्य आहे, असे लोकांचे म्हणणे आहे.