Tribute to Martyrs on Memorial Day | स्मृतीदिनी शहिदांना श्रद्धांजली
स्मृतीदिनी शहिदांना श्रद्धांजली

ठळक मुद्देपोलीस मुख्यालयात कार्यक्रम : परेड व फायर करून दिली शहिदांना सलामी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पोलीस स्मृती दिनानिमित्त कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना सोमवारी (दि.२१) पोलीस मुख्यालयात सलामी देऊन श्रद्धांंजली अर्पण करण्यात आली.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे व पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी पोलीस हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. तसेच उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही गुलाबाचे फुल व पुष्प अर्पण केले. याप्रसंगी तांबडे यांनी, ज्यांनी वेळोवेळी कर्तव्य पथावर अग्रेसर असताना लोकतंत्र रक्षणार्थ आपल्या जिवाची पर्वा न करता ‘आपला आज’ देशवासीयांच्या उद्यासाठी स्वत:चे प्राण अर्पण केलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून २१ ऑक्टोबर हा दरवर्षी देशभर पोलीस स्मृतीदिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे सांगीतले.
२१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस प्रशासनासाठी अत्याधिक महत्त्वाचा आहे. या वर्षी देखील संपूर्ण भारतामध्ये आपले कर्तव्य बजावित असतांना शहिद झालेल्या एकूण २९२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे व महिला पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांनी वाचली. राखीव पोलीस निरीक्षक कमलाकर घोटेकर यांनी शहीद पोलीस स्मृतीदिन सलामीचे नेतृत्व करुन शोक सलामी दिली. सलामी परेड मधील पोलीस कर्मचाऱ्यांकडून हवेत प्रत्येकी तीन राऊंड फायर करण्यात आले. संचालन सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप अतुलकर यांनी केले. कार्यक्रमासाठी पोहवा सेवक राऊत, नापोशि राज वैद्य तसेच पोलीस मुख्यालय येथील डी.आय.स्टॉफने सहकार्य केले. याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक (गृह) सोनाली कदम यांच्यासह मोठ्या संख्येत पोलीस अधिकारी-कर्मचारी व शहिदांचे कुटूंबीय उपस्थित होते.


Web Title: Tribute to Martyrs on Memorial Day
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.