वृक्षांवर जाहिराती, लायटिंग लावाल तर थेट गुन्हा दाखल होणार; अधिनियमांचे उल्लंघन पडणार महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 20:21 IST2026-05-12T20:20:25+5:302026-05-12T20:21:54+5:30
Gondia : प्रदूषण आणि उष्णतेच्या बाबतीत संवेदनक्षम असलेल्या शहरात झाडेच ऑक्सिजनचा मुख्य स्रोत आहेत. मात्र, याच झाडांच्या जीवावर आता जाहिरातदार आणि हौशी नागरिक उठले आहेत.

If you put advertisements and lighting on trees, a crime will be registered immediately; Violation of the act will be costly
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्रदूषण आणि उष्णतेच्या बाबतीत संवेदनक्षम असलेल्या शहरात झाडेच ऑक्सिजनचा मुख्य स्रोत आहेत. मात्र, याच झाडांच्या जीवावर आता जाहिरातदार आणि हौशी नागरिक उठले आहेत. झाडांना खिळे ठोकून जाहिरात फलक लावणे, रंगवणे आणि लखलखत्या विद्युतरोषणाईने त्यांना गुंडाळणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. झाडे ही केवळ नैसर्गिक संपत्तीसह शहराचा श्वास आहेत. 'महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५' नुसार झाडांना खिळे ठोकणे, फांद्या छाटणे किंवा त्यांना कोणत्याही प्रकारे इजा पोहोचवणे हा गंभीर आणि दखलपात्र गुन्हा आहे.
खिळ्यांमुळे झाडांना जखमा, कीडही लागते
खिळे ठोकल्यामुळे झाडाच्या ऊतींना इजा होते. या जखमेतून बुरशी आणि कीड झाडाच्या आत शिरते. यामुळे झाड आतून पोखरले जाऊन कमकुवत होते आणि पावसाळ्यात अशीच झाडे अचानक उन्मळून पडतात, ज्यामुळे जीवितहानीचा धोका वाढतो.
दोषींना शिक्षा आणि दंड
या कायद्यांतर्गत दोषींना १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. या 'छळवादा'मुळे वृक्षांना मरणकळा आली असून, आता अशा दोषींवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी प्रशासनाने तसेच वनविभागाने सुरू केली आहे.
झाडांना इजा पोहोचवणे दखलपात्र गुन्हा
झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ या कायद्यानुसार झाडाला इजा करणे, फांद्या तोडणे किंवा खिळे ठोकणे हा दखलपात्र गुन्हा आहे. मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ : सार्वजनिक ठिकाणी असलेल्या झाडांचे विद्रुपीकरण केल्यास दंड आणि कारावासाची तरतूद आहे.
खिळे ठोकून जाहिराती, पाट्यांचा मारा
झाडांच्या खोडावर खिळे ठोकून त्यावर कोचिंग क्लासेस, डॉक्टर, इव्हेंट मॅनेजमेंट आणि राजकीय शुभेच्छांच्या पाट्या लावल्या जातात. जिल्ह्यातसुद्धा असले प्रकार घडत असून कित्येक ठिकाणी झाडे पाट्यांनी अक्षरशः झाकली गेली आहेत.
झाडांच्या मुळावर उठले लोक!
शहरातील मुख्य चौक असो वा अंतर्गत रस्ते, झाडांचा वापर जिवंत 'होर्डिंग'सारखा केला जात आहे. स्वतःच्या व्यवसायाची प्रसिद्धी करण्यासाठी निसर्गाची हानी करताना नागरिक संवेदना हरवून बसले आहेत. झाडांना केवळ लाकूड समजून त्यावर होणारे आघात वृक्षांचे आयुष्य वेगाने कमी करत आहेत. गोंदिया-तिरोडा मार्गावरील अशा झाडांना मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावल्याचे दिसून येते.
विद्युतरोषणाईचाही झाडांना ताप
सध्या हॉटेलिंग आणि विवाह सोहळ्यांसाठी झाडांना 'एलईडी' माळांनी घट्ट गुंडाळले जाते. हे केवळ विद्रुपीकरण नसून झाडासाठी एक प्रकारचा 'शॉक' आहे. विद्युत तारांच्या घट्ट विळख्यामुळे झाडाला मोकळेपणाने श्वास घेता येत नाही.
उष्णता वाढते, पक्ष्यांचा अधिवास हिरावतो
सततच्या लायटिंगमुळे निर्माण होणारी उष्णता झाडांच्या नैसर्गिक वाढीवर परिणाम करते. झाडावर वास्तव्यास असणारे पक्षी आणि कीटक या कृत्रिम प्रकाशामुळे आपला अधिवास सोडून पळत आहेत. पक्ष्यांच्या प्रजनन चक्रावरही याचे घातक परिणाम होत आहेत.
"झाडांना विद्युतरोषणाईने विळखा घातल्यामुळे त्यांच्या नैसर्गिक वाढीवर विपरीत परिणाम होतो. वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे आम्ही अशा कृत्यांवर बारीक लक्ष ठेवून आहोत. जे व्यावसायिक किंवा नागरिक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी झाडांचा 'बळी' देत आहेत, त्यांच्यावर भारतीय वन अधिनियमाच्या विविध कलमान्वये कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल."
- ए.एच. सोनटक्के, वनपरिक्षेत्र अधिकारी-आमगाव.