पंतप्रधान 'नारी शक्ती' विधेयक यशस्वी करतीलच: दिगंबर कामत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 07:26 IST2026-04-21T07:26:09+5:302026-04-21T07:26:59+5:30
मडगाव येथे बसवेश्वर जयंती उत्साहात

पंतप्रधान 'नारी शक्ती' विधेयक यशस्वी करतीलच: दिगंबर कामत
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : महिलांच्या राजकीय आरक्षणासंबंधीचे 'नारी शक्ती' विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी व्यक्त केला. येथील श्री वीरशैव लिंगायत मठात आयोजित ८९२ व्या श्री बसवेश्वर जयंतीनिमित्त कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
व्यासपीठावर योगीराज कामत, लिंगायत मठ व्यवस्थापन समितीचे विवेकानंद पाटील व दयानंद पट्टणशेट्टी उपस्थित होते. मंत्री कामत म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी तसेच काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यासारखी विरोधकांना अशक्यप्राय वाटणारी कामे
प्रत्यक्षात करून दाखवली आहेत. त्याचप्रमाणे महिलांच्या आरक्षणाचे 'नारी शक्ती' विधेयकही यशस्वी करून दाखवतील.
'आजच्या महिला सुशिक्षित, जागरुक'
कामत म्हणाले, की महिला आरक्षण हा माता-भगिनींचा हक्क आहे. आजच्या महिला राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक क्षेत्रात ठसा उमटवत आहेत. पूर्वी महिलांना मतदानासाठी मार्गदर्शन करावे लागायचे; मात्र आज त्या सुशिक्षित, जागरूक व सक्षम असून स्वतःचे निर्णय घेण्यास समर्थ आहेत.
बसवेश्वर यांनी दाखवलेला मार्ग प्रेरणादायी
श्री बसवेश्वर यांनी दाखवलेला समता व स्त्री-पुरुष समानतेचा मार्ग आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्या काळात त्यांच्या विचारांना अपेक्षित साथ मिळाली नाही; मात्र आजच्या काळात महिलांना समान हक्क देण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे कामत म्हणाले.
दरम्यान, योगीराज कामत यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमातील कलाकारांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. 'गीतरामायण' कार्यक्रमाच्या दिग्दर्शिका सरोजा नाईक यांचा दिगंबर कामत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रनिवेदन सरोजा नाईक व अॅड. विनय पाटकर यांनी केले. प्रारंभी सतीश मुंगरवाडी यांनी स्वागत केले. त्यांनी लिंगायत मठाच्या कार्याचा आढावा दिला.