जूनपासून बेकायदा बोअरवेल्स सील करणार: मंत्री सुभाष शिरोडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 12:23 IST2026-05-07T12:22:53+5:302026-05-07T12:23:29+5:30
सर्वेक्षणाच्या आधारे संपूर्ण राज्यातील बेकायदेशीर बोअरवेल्सची यादी तयार करण्यात येणार आहे.

जूनपासून बेकायदा बोअरवेल्स सील करणार: मंत्री सुभाष शिरोडकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : बेकायदा बोअरवेल्स सील करण्याची मोहीम येत्या जूनपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.
पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर ते म्हणाले की, राज्यभरातील अनधिकृत बोअरवेल्सचे सविस्तर सर्वेक्षण करण्याचे निर्देश विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या सर्वेक्षणाच्या आधारे संपूर्ण राज्यातील बेकायदेशीर बोअरवेल्सची यादी तयार करण्यात येणार आहे.
चिंबल परिसरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईला सुरुवात करण्यात आली असून, आत्तापर्यंत २२ अनधिकृत बोअरवेल्स सील करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने या भागातील सुमारे ७० बोअरवेल्स सील करण्याचे निर्देश दिले होते. उर्वरित बोअरवेल्सही लवकरच टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार असल्याचे शिरोडकर यांनी स्पष्ट केले.
शिरोडकर म्हणाले की, मे महिना हा उन्हाळ्याचा कळस गाठणारा कालावधी असल्याने सध्या सर्व बोअरवेल्स तत्काळ सील करणे शक्य नाही. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता नागरिकांना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी ही कारवाई टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. सरकारने ही मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी होत आहे.
७० अनधिकृत बोअरवेल्स सील करण्याचे आदेश
चिंबल परिसरात गेल्या काही वर्षांत अनधिकृत बोअरवेल्सचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. काही भागांत पाण्याची पातळी झपाट्याने खाली गेल्याच्या तक्रारी समोर आल्या. याशिवाय, अनियंत्रित पाणीउपशामुळे स्थानिक जलस्रोतांवर ताण निर्माण झाला, तर काही ठिकाणी खाऱ्या पाण्याची झिरपण वाढल्याचीही भीती व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी आणि पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर उच्च न्यायालयाने चिंबेलमधील सुमारे ७० अनधिकृत बोअरवेल्स सील करण्याचे आदेश दिले होते.