प्रश्नपत्रिकेत नसलेल्या प्रश्नाच्या उत्तराची कॉपी पकडली; दहावी परीक्षेतील अजब प्रकार उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 10:41 IST2026-04-26T10:39:22+5:302026-04-26T10:41:41+5:30
एका परीक्षा केंद्रावर एक अतिशय विचित्र आणि थक्क करणारा प्रकार समोर आला आहे.

प्रश्नपत्रिकेत नसलेल्या प्रश्नाच्या उत्तराची कॉपी पकडली; दहावी परीक्षेतील अजब प्रकार उघडकीस
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोवा शालान्त मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. मात्र, यंदाच्या परीक्षेत दक्षिण गोव्यातील एका परीक्षा केंद्रावर एक अतिशय विचित्र आणि थक्क करणारा प्रकार उघडकीस आला आहे.
एका हुशार विद्यार्थ्याने परीक्षेच्या वेळी खिशातून कॉपी बाहेर काढली. परंतु विशेष म्हणजे, त्याने ज्या प्रश्नाची कॉपी आणली होती तो प्रश्नच मुळात प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आला नव्हता.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थ्याने परीक्षेसाठी जय्यत तयारी म्हणून कॉपी लिहून आणली होती. पेपर सुरू असताना त्याने ती वापरण्यासाठी खिशातून बाहेरही काढली. मात्र, त्याने आणलेल्या मजकुराचा प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाशी दुरान्वयेही संबंध नव्हता. तरीही ती कॉपी बाहेर काढण्याची जोखीम त्याने का पत्करली, हे एक कोडेच आहे.
ही बाब तिथे उपस्थित असलेल्या पर्यवेक्षकांच्या नजरेतून सुटली नाही आणि त्या विद्यार्थ्याला रंगेहात पकडण्यात आले. काही विद्यार्थी केवळ गुण मिळवण्यासाठी कॉपी करतात की आपल्या मित्रांमध्ये मिरवण्यासाठी असे धाडस करतात, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. जो प्रश्न परीक्षेत विचारलाच नाही, त्याची कॉपी बाहेर काढणे आणि ती पकडली जाणे हा प्रकार यंदाच्या परीक्षेतील चर्चेचा विषय ठरला आहे.
अभ्यासात हुशार, तरीही कारनामा
सामान्यतः अभ्यासात मागे असलेले विद्यार्थी कॉपी करतात असा एक समज असतो, पण या विद्यार्थ्याने तो समज फोल ठरवला आहे. हा विद्यार्थी अभ्यासात अतिशय हुशार असूनही त्याने ही चूक केली. विशेष म्हणजे, हा पेपर मराठी विषयाचा होता. इतका सोपा विषय आणि स्वतः हुशार असूनही त्याने कॉपी का आणली आणि उपयोगाची नसतानाही ती बाहेर का काढली, याचे उत्तर आता त्या विद्यार्थ्यालाच ठाऊक.
संबंधित परीक्षा केंद्राकडून या प्रकरणाची माहिती योग्य माध्यमांतून मंडळाला प्राप्त झाली. या विद्यार्थ्याने प्रत्यक्षात कॉपीचा वापर करून उत्तरे लिहिली नसल्यामुळे, त्याचे गुण कमी करण्यासारखी कठोर कारवाई मंडळाने टाळली आहे. मात्र, संबंधित विद्यार्थ्याला भविष्यासाठी कडक शब्दांत समज देण्यात आली आहे. - भगिरथ शेट्ये, अध्यक्ष, शालान्त मंडळ.