जनतेच्या अपेक्षा भाजपच पूर्ण करणार: मंत्री विश्वजीत राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 14:57 IST2026-05-19T14:56:40+5:302026-05-19T14:57:35+5:30
राज्यात यापुढेही भाजपला सत्तेवर आणण्यासाठी एकत्र राहूया, नगरगाव पंचायतक्षेत्रात लोकांची बैठक

जनतेच्या अपेक्षा भाजपच पूर्ण करणार: मंत्री विश्वजीत राणे
लोकमत न्यूज नेटवर्क, वाळपई : लोकांच्या अपेक्षा राज्यातील भाजपचे सरकारच पूर्ण करील. लोकांनी कायम भाजप सरकारसोबत रहावे. आम्ही सगळे मिळून पुन्हा एकदा राज्यात भाजपचे सरकार अधिकारावर आणूया, असे आवाहन मंत्री विश्वजीत राणे यांनी काल केले.
वाळपई मतदारसंघातील नगरगाव पंचायत क्षेत्रात काल सोमवारी मंत्री राणे यांनी लोकांची बैठक घेऊन विविध प्रश्नांबाबत संवाद साधला. लोकांच्या अपेक्षाही जाणून घेतल्या. नगरगाव येथील श्री शांतादुर्गा मंदिर सभागृहात ही बैठक झाली. यावेळी अनेक मान्यवर व्यासपीठावर होते.
मंत्री विश्वजीत राणे पुढे म्हणाले की, प्रशासन जनतेच्या दारी नेऊन आम्ही विविध प्रश्न सोडवत आहोत. जनतेच्या हितासाठी कायम झटत असून यापुढेही लोकांची सेवा करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे जी विधानसभा निवडणूक होईल, त्या निवडणुकीवेळीही जनतेने भाजपची साथ द्यावी. आम्ही लोकांच्या कल्याणासाठी सतत प्रयत्न करत राहू, असे मंत्री राणे म्हणाले.
यापुढे वाळपई पालिका क्षेत्रात व इतरत्र आपल्या बैठका होतील, असेही राणे यांनी स्पष्ट केले. बैठकीनंतर मोठ्या संख्येने लोक राणे यांना भेटले व त्यांनी विविध विषय मांडले. नगरगावमधील एका अकरा वर्षीय मुलावर वाळपई येथील आरोग्य केंद्रात नीट उपचार न झाल्याने पाय गमवावा लागला होता. राणे यांनी त्या मुलाच्या घरी काल भेट दिली व कुटूंबियांशी चर्चा केली.
लोककल्याणासाठीच राजकारणात
मंत्री राणे म्हणाले की, आपण लोककल्याणासाठीच राजकारणात आलो आहे. आपल्या वडिलांनी कायम सत्तरी तालुक्याची सेवा केली. आपणही सत्तरी तालुक्यात लोकसेवा करत आहे. काहीवेळा लोकांचे प्रश्न वगैरे सोडविण्यासाठी विलंब लागला तरी, आम्ही काही तरी तोडगा काढतच असतो. लोकांना संकट आले तर आम्ही मदतीसाठी धावतोच. भाजपच्या नेतृत्वाखाली सध्या सरकार रोजगार संधी निर्माण करत आहे. यापुढेही अधिक रोजगार संधी निर्माण केल्या जातील पण लोकांनी कायम सरकारसोबत रहावे, भाजपसोबत रहावे.