गडचिरोलीत ९३७ हेक्टर संरक्षित वनजमीन खाणकामासाठी लॉयड्स कंपनीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 16:04 IST2026-05-05T16:03:06+5:302026-05-05T16:04:37+5:30
Gadchiroli : राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील ९३७.०७७ हेक्टर राखीव व संरक्षित वनजमीन खाणकामासाठी वळती करण्यास मंजुरी दिली आहे. ही जमीन लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीला दिल्याचे सोमवारी जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.

Lloyds Company to acquire 937 hectares of protected forest land in Gadchiroli for mining
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील ९३७.०७७ हेक्टर राखीव व संरक्षित वनजमीन खाणकामासाठी वळती करण्यास मंजुरी दिली आहे. ही जमीन लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीला दिल्याचे सोमवारी जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील हेडरी, बांडे आणि परसलगोंदी (एटापल्ली परिक्षेत्र) येथील विद्यमान खाणींच्या शेजारील भागात कमी प्रतीच्या लोहखनिजाच्या (हेमाटाइट उत्खननासाठी हि वनजमीन देण्यात आली आहे. संबंधित कंपनी सध्या गडचिरोली जिल्ह्यात सुमारे ३४८ हेक्टर क्षेत्रावर खाणकाम करत आहे.
वनजमीन वळविण्याचा प्रस्ताव मार्च २०२४मध्ये नागपूर येथील अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक व नोडल अधिकाऱ्यांनी वन (संरक्षण) अधिनियम १९८०अंतर्गत सादर केला होता. राज्य सरकारमार्फत हा प्रस्ताव जून २०२४मध्ये केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. केंद्र सरकारने मे २०२५मध्ये अटींसह तत्त्वतः मंजुरी दिली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२६मध्ये अटींची पूर्तता सादर केल्यानंतर एप्रिल २०२६मध्ये वनजमीन हस्तांतरीत करण्यासाठी अंतिम मंजुरी देण्यात आली. दरम्यान, या प्रकल्पासाठी स्वतंत्र वन्यजीव मंजुरीची आवश्यकता नाही. गडचिरोली येथील मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या सल्ल्याने ही जमीन प्रमाणित करणे आवश्यक असल्याची अट घालण्यात अली आहे.