जंगली हत्तींच्या कळपाने वनविभागालाही आणले जेरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 10:48 AM2022-01-17T10:48:06+5:302022-01-17T10:52:37+5:30

जंगली हत्तींकडून शेतात केल्या जाणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी नियमानुसार त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळेलही, घरांच्या नुकसानीसाठी भरपाई देण्याबाबतच अद्याप शासन स्तरावरून ठोस निर्णय झालेला नाही.

forest department Anxious over wild elephants herd | जंगली हत्तींच्या कळपाने वनविभागालाही आणले जेरीस

जंगली हत्तींच्या कळपाने वनविभागालाही आणले जेरीस

Next
ठळक मुद्देनियंत्रण ठेवणे अशक्य, नागरिकांनाच खबरदारी घ्यावी लागणार

गडचिरोली : गेल्या अडीच महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात मुक्तपणे फिरणारा जवळपास २२ जंगली हत्तींचा कळप गडचिरोलीचे वनक्षेत्र सोडायला तयार नाही. त्यामुळे वनविभागाचेही टेन्शन वाढले आहे. या हत्तींकडून शेतात केल्या जाणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी नियमानुसार त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळेलही, घरांच्या नुकसानीसाठी भरपाई देण्याबाबतच अद्याप शासन स्तरावरून ठोस निर्णय झालेला नाही.

ओरिसा राज्यातून भरकटत आलेले हे हत्ती जवळपास वर्षभर छत्तीसगड राज्यातील जंगलात फिरत होते. त्यानंतर, अडीच महिन्यांपूर्वी ते गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीत शिरले. धानाच्या शेतीसोबत या हत्तींनी घरात ठेवलेल्या मोहफुलाच्या वासाने अनेक घरांचेही नुकसान केले आहे. या हत्तींना गावापासून दूर ठेवण्यासाठी वनविभागाने गावकऱ्यांना विविध उपाय सांगितले आहेत, पण ते काहीसे खर्चिक असल्याने गोरगरीब लोकांना परवडणारे नाहीत.

या हत्तींवर वनविभागाची पाळत आहे. त्यांनी ज्या घरांचे नुकसान केले त्याचे पंचनामे करून, नुकसानभरपाईचे प्रस्ताव वनविभागाने पाठविले. मात्र, त्याबाबत अजून ठोस निर्णय झालेला नाही.

या जंगली हत्तींना गुजरातमध्ये न्या हो...

दरम्यान, कमलापूर, आलापल्लीतील पाळीव हत्तींना गुजरातमध्ये घेऊन जाण्याबाबत वन्यजीव विभागाच्या हालचालींना सर्व स्तरांतून, सर्व पक्षांकडून विरोध होत आहे. गुजरातला हत्तीच हवे असतील, तर हे जंगली हत्ती न्यावेत, म्हणजे तुम्हाला हत्तीही मिळतील आणि आमची डोकेदुखीही कमी होईल, अशी भावना कुरखेडा, देसाईगंज तालुक्यातील सामान्य नागरिकांमध्ये उमटत आहे.

हे जंगली हत्ती लहानपणापासून जंगलात मुक्तपणे फिरत आहेत. त्यामुळे त्यांना विशिष्ट ठिकाणी बंदिस्त वातावरणात ठेवणे शक्य नाही. तसा प्रयत्न केल्यास ते हिंसक होऊ शकतात. तूर्त त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवणे, नागरिकांना सतर्क करणे आणि झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव पाठविणे, एवढेच वनविभागाच्या हातात आहे.

- डॉ.किशोर मानकर, वनसंरक्षक, गडचिरोली वनवृत्त.

Web Title: forest department Anxious over wild elephants herd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.