विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 08:13 IST2026-05-13T08:06:03+5:302026-05-13T08:13:42+5:30

भाजपने इतर पक्षांतून आयात केलेल्या वजनदार नेत्यांचे भक्कम जाळे पंजाबमध्ये उभे केले आहे. या राज्यात मोठी झेप घेण्याची मोर्चेबांधणी तयार झालेली आहे!

Special Explained by harish gupta: Narendra Modi-Amit Shah's next target? - Punjab Assembly elections of course! | विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!

विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!

-हरीष गुप्ता (नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)
भाजपला स्वत:च्या बळावर कधीही जिंकता आलेला नाही असा एक महत्त्वाचा राजकीय किल्ला - पंजाब.  मात्र आता २०२७च्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नरेंद्र मोदी-अमित शाह जोडी या राज्यात राजकीय, सामाजिक आणि मानसिक पातळीवर आक्रमक रणनीती आखताना दिसत आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आम आदमी पार्टीचे सरकार अधिकाधिक असुरक्षित होत चालल्याचा भाजपचा विश्वास आहे. अमृतसरमधील खासा येथे लष्करी छावणीजवळ आणि जालंधरमधील बीएसएफ पंजाब फ्रंटियर मुख्यालयाबाहेर झालेले अलीकडचे दोन कमी तीव्रतेचे स्फोट भाजपला राष्ट्रीय सुरक्षेचा प्रभावी मुद्दा मिळवून देणारे ठरले.

खलिस्तानी घटक पुन्हा संघटित होण्याचा प्रयत्न करत असलेल्या या संवेदनशील सीमावर्ती राज्यात मान सरकार सुरक्षेच्या बाबतीत कमकुवत असल्याचे चित्र रंगवायला भाजपने सुरुवात केली आहे. मात्र भाजपचे सर्वात प्रभावी शस्त्र कोणते? - त्यांचे पोलिटिकल इंजिनिअरिंग ! 

भाजपने इतर पक्षांमधून आयात केलेल्या वजनदार नेत्यांचे भक्कम जाळे पंजाबमध्ये उभे केले आहे. पंजाब भाजपचे अध्यक्ष सुनील जाखर काँग्रेसमधून आले. केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनीही काँग्रेस सोडली. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आधीपासूनच भगव्या छावणीत आहेत.

आता राघव चढ्ढा आणि ‘आप’च्या सहा राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये केलेल्या नाट्यमय प्रवेशामुळे पक्षाच्या विस्तार योजनांना नवी गती मिळाली आहे. या सगळ्याचा निष्कर्ष? - एकच ! - आता देशाच्या अस्थिर सीमावर्ती पट्ट्यात पुढची मोठी राजकीय झेप घेण्याची तयारी भाजपने चालवली आहे.

सुवेंदू आणि सर्मा यांच्यातील समान धागा 

दशकानुदशके भारतातील विरोधी पक्षांनी एक राजकीय कला उत्तमरीत्या आत्मसात केली- रणांगणातील सेनानींपेक्षा घराण्यांना प्राधान्य देणे. दुसरीकडे भाजपने नेमके उलटे तंत्र विकसित केले- घराणेशाहीच्या दरबारात दुर्लक्षित झालेल्या महत्त्वाकांक्षी प्रादेशिक नेत्यांना ओळखणे आणि त्यांना मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचवणे. सुवेंदू अधिकारी आणि  हिमंता बिसवा सर्मा यांना जोडणारा समान धागा हाच आहे.

अधिकारी हे नंदीग्राम आंदोलनाचे शिल्पकार होते.  रस्त्यावर लढणाऱ्या ममता बॅनर्जी यांना बंगालच्या निर्विवाद शासकापर्यंत पोहोचवणारे जनसंघटक होते. अनेक वर्षे त्यांना पक्षाचा नैसर्गिक राजकीय वारस मानले जात होते. मात्र पक्षाने अचानक पुढील नेतृत्वासाठी ममतांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे कल दाखवला आणि उत्तराधिकाराची पटकथा बदलली. अधिकारी यांनी २०२० मध्ये तृणमूलची साथ सोडली. भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते बंगालमधील भगव्या छावणीचे ‘राजा’ बनले.

आसामची कहाणीही तशीच आहे. सर्मा यांनी ईशान्य भारतात काँग्रेसची वीट-वीट रचून तब्बल २५ वर्षे उभारणी केली; पण उत्तराधिकाराचे राजकारण समोर येताच पक्षश्रेष्ठींना माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे पुत्र गौरव गोगोई अधिक पसंत असल्याचे दिसले.

सर्मा यांनी २०१५ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. आज ते केवळ केवळ आसामचे नाहीत, तर संपूर्ण ईशान्य भारतातील भाजपचे प्रमुख रणनीतिकार आहेत.

घराणेशाहीमुळे कमकुवत झालेल्या पक्षांकडून अनेकदा त्यांचे सर्वात प्रभावी सेनानी निसटून जातात. भाजपचा उदय केवळ निवडणूक यंत्रणा किंवा आक्रमक प्रचारावर अवलंबून नाही. कुटुंबकेंद्रित पक्षांनी बाजूला सारलेल्या नेत्यांना ओळखणे, वारशापेक्षा महत्त्वाकांक्षेला प्राधान्य देणे आणि राजकीय असंतोषाचे रूपांतर निवडणूक शक्तीत करणे हाच भाजपचा खरा दीर्घकालीन खेळ आहे.

नितीश यांचीही घराणेशाही

वर्षानुवर्षे नितीश कुमार यांनी आपली राजकीय प्रतिमा दोन दाव्यांभोवती उभी केली होती- स्वच्छ प्रशासन आणि घराणेशाहीविरोधातील  भूमिका. मात्र त्यांचा पुत्र निशांत कुमार याची सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारमध्ये आरोग्यमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी जपलेली नैतिक उंची कोसळल्याचे दिसते.

अवघ्या महिनाभरापूर्वी जनता दल (युनायटेड)मध्ये प्रवेश केलेला आणि एकदाही निवडणूक न लढलेला निशांत मंचावर वडिलांच्या पायाला स्पर्श करून थेट मंत्रिपदावर पोहोचला. संघटनात्मक पातळीवरील वर्षानुवर्षांची धडपड नाही, निवडणुकीची कसोटी नाही, विधिमंडळाचा अनुभव नाही- गुणवत्ता काय?- तर फक्त घराणे!

दशकानुदशके नितीश यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर घराणेशाहीचा ठपका ठेवला, अखेरीस त्यांनीही तीच संस्कृतीला कवटाळली! ‘परिवारवाद’ हा लोकशाहीसाठी धोका असल्याचे सांगणारी भाजपची भगवी छावणीही गप्प राहिली!
harish.gupta@lokmat.com

Web Title : अगला लक्ष्य पंजाब: मोदी-शाह की निगाहें राज्य चुनावों पर

Web Summary : भाजपा की नजर पंजाब के 2027 के चुनावों पर है, आप की सुरक्षा पर कथित कमजोरी का फायदा उठा रही है। अन्य दलों के नेताओं के साथ रणनीतिक गठबंधन भाजपा के विस्तार को बढ़ावा दे रहे हैं, जो अन्य राज्यों में राजवंश की राजनीति पर महत्वाकांक्षा को प्राथमिकता देकर इस्तेमाल की जाने वाली रणनीति को दर्शाते हैं।

Web Title : Next Target Punjab: Modi-Shah's Eye on State Elections

Web Summary : BJP eyes Punjab's 2027 elections, exploiting AAP's perceived weakness on security. Strategic alliances with leaders from other parties are fueling BJP's expansion, mirroring tactics used in other states by prioritizing ambition over dynasty politics.