वाचनीय लेख - सिनेमा हिट की फ्लॉप हे आधीच सांगता येईल?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 12:24 PM2022-12-03T12:24:08+5:302022-12-03T12:24:55+5:30

एखादा चित्रपट लोकांना आवडेल की नाही? - याचा अंदाज कृत्रिम बुद्धिमत्तेला बांधता येऊ शकतो का? - ताजी संशोधने सांगतात, हे शक्य आहे!

Can you predict whether a movie will be a hit or a flop? | वाचनीय लेख - सिनेमा हिट की फ्लॉप हे आधीच सांगता येईल?

वाचनीय लेख - सिनेमा हिट की फ्लॉप हे आधीच सांगता येईल?

Next

विश्राम ढोले

तुमच्यापैकी अनेकांनी कंतारा पाहिला असेल आणि बहुतेकांनी लालसिंग चढ्ढा पाहिला नसेल. प्रदर्शित होण्यापूर्वी कंताराची फारशी हवा नव्हती; पण तो सुपर-डुपर हिट झाला आणि चढ्ढाची पुरेशी हवा होऊनही तो आपटला. चित्रपटांच्या बाबतीत असं बरेचदा घडतं. संगीत, चित्रकला यासारख्या इतरही कलांच्याही बाबतीत असा अनुभव येतो. कोणती कलाकृती लोकांना आवडेल आणि कोणती नाही हा फार बेभरवशाचा खेळ असतो. त्यात आवडलेली कलाकृती सौंदर्यमूल्यांवर दर्जेदार असेलच, हेही निश्चित नसते. 

अनेकदा लोकप्रियता हीच लोकप्रियतेला जन्म देते. एखादा चित्रपट अनेकांनी बघितला, असे दिसले की आपणही तो बघायला जातो, असलेल्या लोकप्रियतेत भर टाकतो. सामाजिक मानसशास्त्राच्या परिभाषेत याला गर्दीचा पुरावा म्हणतात.  आपल्याकडे निर्णय घेण्यासाठी पुरेशी माहिती नसते वा निर्णय घेण्याची तयारी नसते, तेव्हा आपण गर्दीच्या निर्णयाची नक्कल करतो. प्रेक्षक म्हणून टाळी वाजवावी, असे काही आपल्याला झालेले नसते; पण पहिल्या एक-दोन टाळ्या पडल्या की आपणही आपसूक टाळ्या वाजवायला लागतो. त्यामुळे कलाकृतीमधले काय आवडते, काय चांगले आहे, आवडलेले किती पसरेल आणि आवडलेल्या गोष्टीचा कंटाळा कधी येईल, हे प्रश्न कलेच्या- विशेषतः व्यावसायिक कलेच्या- क्षेत्रात खूप महत्त्वाचे ठरतात. या साऱ्या प्रश्नांची उत्तरे अनिश्चित असतात. पण अनिश्चिततेत दडलेल्या वृत्ती-प्रवृत्ती शोधणे, त्यावरून अंदाज बांधणे हा तर विदाबुद्धीचा आवडता छंद. व्यावसायिक कलाकृतींमध्ये फार मोठी आर्थिक गुंतवणूक असेल तिथे तर असा अंदाज बांधणे फक्त छंद नाही तर व्यावसायिक गरज असते. पूर्वी हे अनुभवी व्यक्तींच्या सांगण्यावर, आतल्या आवाजावर बेतलेले असायचे; पण आता त्याला विदा आणि अल्गोरिदमची जोड मिळू लागली आहे. 

असाच एक पथदर्शी अभ्यास अमेरिकेतील समीत श्रीनीवासन यांनी २१३ साली केला होता. इंटरनेट मुव्ही डेटाबेस (आयएमडीबी) या जगभरातील चित्रपटासंबंधीच्या प्रचंड मोठ्या विदापेढीची त्यांनी त्यासाठी मदत घेतली. या विदापेढीवर चित्रपटांच्या माहितीबरोबरच लोक चित्रपटांना त्यांच्या आकलनानुसार कळीचे शब्द (टॅग्स) जोडू शकतात. त्यामधून चित्रपटांचे  थोडक्यात मुखदर्शन होते. समीत यांनी त्या कळीच्या शब्दांच्या रूपातील प्रचंड विदेचा अभ्यास केला. त्यातील वृत्ती-प्रवृत्तींची सांगड चित्रपटांच्या व्यावसायिक यशाशी घातली. उद्देश हाच होता की कोणत्या काळात कोणत्या प्रकारचे चित्रपट नावीन्यपूर्ण ठरले, कोणते पठडीबाज निघाले आणि त्यांना लोकांचा प्रतिसाद कसा मिळत गेला. या अभ्यासातून एक गोष्ट स्पष्ट झाली. लोकांना नावीन्य आवडते हे खरेच; पण ते नावीन्य फार आमूलाग्र असेल तर तेही लोकांच्या पचनी पडत नाही. म्हणजे नावीन्य तर हवे; पण ते ओळखू येण्याच्या प्रांताबाहेरचे नको. समाजशास्त्रज्ञांना, कलाकारांना हे माहीतच होते; पण समीत यांच्या अभ्यासाने त्याला विदेचा आधार दिला, सांख्यिकी विश्लेषणाची जोड दिली आणि संख्येच्या भाषेत त्याचे अंदाज वर्तविले. अशाच दुसऱ्या एका अभ्यासात चित्रपट प्रदर्शित होण्याच्या महिनाभर आधी त्या चित्रपटाच्या विकिपीडिया पानाचे संपादन कितीवेळा होते, यावरून चित्रपट व्यावसायिक पातळीवर किती यशस्वी होईल, याचे अंदाज बांधण्यात आले आणि ते जवळजवळ ७० टक्के बरोबर निघाले. पहिल्या सहा यशस्वी चित्रपटांच्या बाबतीत तर ते ९९ टक्के बरोबर निघाले. कोणत्या कलाकृतीला व्यावसायिक यश मिळेल, याच्याइतकाच महत्त्वाचा प्रश्न असतो, तो एखाद्या व्यक्तीला कोणती कलाकृती आवडेल, हे सांगता येणे. आणि ते सामूहिक नाही तर व्यक्तिगत पातळीवर सांगावे लागते. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईमपासून ते स्पॉटिफाय, ऑडिबलपर्यंत अनेक डिजिटल सुविधांना हे लागू आहे. या सगळ्या सुविधांचा आधार आहे ती रेकमेंडेशन अल्गोरिदम. तिथे वापरणाऱ्याच्या आवडीनिवडी काय आहेत आणि त्याच्याशी मिळतेजुळते आणि थोडे नवे यामधले काय देता येईल, याचा विचार करावा लागतो. 

तुम्ही काय ऐकता, वाचता, पुन्हा त्यापाशी कितीवेळा येता, त्याचा इतरत्र किती शोध घेता, तुमच्यासारखी आवड-निवड असणारे काय-काय बघतात, ऐकतात अशा अनेक गोष्टींची विदा एकत्र केली जाते आणि त्याचे खोल-खोल विश्लेषण करून तुम्ही काय पाहावे, ऐकावे याच्या शिफारशी केल्या जातात. या अल्गोरिदमच्या सुदृढतेवरच या साऱ्या डिजिटल सेवांचे व्यावसायिक भवितव्य अवलंबून असते. म्हणून या अल्गोरिदमवर प्रचंड गुंतवणूक केली जाते. आजमितीला निदान व्यावसायिक कलांचा प्रसार आणि लोकप्रियतेची गणिते बऱ्याच प्रमाणात या विदाबुद्धीवरच अवलंबून आहेत. पण विदाबुद्धी फक्त कलाप्रसारात नाही. तर कलानिर्मितीतही उतरली आहे. एरवी अस्सल मानवी सर्जनशीलतेची क्षेत्रे असलेल्या काव्य, संगीत आणि चित्र या तीन कलाक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता कलाकृती निर्माण करू लागली आहे. त्यांची ओळख पुढील लेखांकात.

(लेखक माध्यम, तंत्रज्ञान, संस्कृती या विषयांचे अभ्यासक आहेत)

Web Title: Can you predict whether a movie will be a hit or a flop?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.