तुळजापूरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; मृतदेह ९० फूट फरफटत नेला, पत्नीसह तिघे संशयित ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 17:10 IST2026-04-16T17:05:29+5:302026-04-16T17:10:02+5:30
कुटुंबाचा एकमेव आधार असलेल्या कृष्णाथ साठे यांची हत्या; पत्नीवरच संशयाची सुई, तुळजापुरात खळबळ.

तुळजापूरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; मृतदेह ९० फूट फरफटत नेला, पत्नीसह तिघे संशयित ताब्यात
तुळजापूर (जि. धाराशिव) : तालुक्यातील मंगरूळ येथे कृष्णाथ आनंद साठे (३६, रा. मंगरूळ) याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १५) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी मृताच्या पत्नीसह तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णाथ साठे यांची मंगळवारी रात्री अज्ञात हत्याराने डोक्यात गंभीर वार करून हत्या करण्यात आली. गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पडीक जमिनीवर हा प्रकार घडला. आरोपींनी केवळ हत्याच केली नाही, तर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तब्बल ९० फूट अंतरावर फरफटत नेऊन ओढ्याच्या कडेला फेकून दिला. बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ग्रामस्थांना हा मृतदेह आढळून आला, त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलिस ठाण्याचे पथक आणि फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची बारकाईने पाहणी करून पंचनामा केला. संशयाची सुई कुटुंबातील व्यक्तींकडे वळल्याने पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. सध्या पोलिसांनी कृष्णाथ यांची पत्नी आणि अन्य दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कृष्णाथचा खून नेमका काेणी आणि कशासाठी केला? रात्री उशिरापर्यंत स्पष्टही झालेले नव्हते, याप्रकरणी तुळजापूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुटुंबाचा आधार हरपला
मयत कृष्णाथ हे कुटुंबातील एकुलते एक पुत्र होते. त्यांचे वडील आजारी असून, आई शेतीकाम करते. घराची सर्व जबाबदारी कृष्णाथ यांच्या खांद्यावर होती. कधी साखर कारखान्यावर, तर कधी तुळजाभवानी मंदिरात सुरक्षारक्षक म्हणून काम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. एकुलत्या एक कमावत्या मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने साठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.