टंचाईचे सावट! अनियंत्रित पाणी उपस्याने मराठवाड्याची भूजल पातळी ८ मीटरने खालावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 18:02 IST2026-04-29T17:55:20+5:302026-04-29T18:02:09+5:30
छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याची भूजल पातळी सर्वात खाली; घागरभर पाण्यासाठी भटकंतीची वेळ.

टंचाईचे सावट! अनियंत्रित पाणी उपस्याने मराठवाड्याची भूजल पातळी ८ मीटरने खालावली
-बाळासाहेब माने
धाराशिव : उन्हाची तीव्रता वाढल्याने भूजल पातळीही झपाट्याने कमी होत आहे. मार्चअखेर ८७५ निरीक्षण विहिरींच्या सर्वेक्षणात मराठवाड्याची पातळी जवळपास ८ मीटरवर खाली गेली आहे. यामध्ये सर्वाधिक छत्रपती संभाजीनगरची १० मीटर, तर जालना जिल्ह्याची ९ मीटरवर गेली आहे. मानवी हस्तक्षेप आणि अनियंत्रित पाणी उपशामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. लातूर, बीड व परभणी जिल्ह्यातील परिस्थिती या मानाने समाधानकारक आहे. भूजल पातळी खालावल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
भूजल सर्वेक्षण विभाग आणि विकास यंत्रणेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यातील निरीक्षण विहिरींच्या माध्यमातून भूजल पातळीची मोजणी केली जाते. मार्चअखेर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील भूजल विभागाने सर्वेक्षण केले आहे. यामध्ये आठ जिल्ह्यांतील जवळपास ८७५ विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची पाणी पातळी खालावल्याचे दिसून आले आहे. त्यापाठोपाठ जालना, हिंगोली, धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे. तर लातूर, बीड, परभणी जिल्ह्यातील पाणी पातळी ७ मीटरवर असून, ही स्थिती समाधानकारक असल्याचे दिसत आहे. गतवर्षी मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. यामुळे भूगर्भातील पाणी पातळी गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक अपेक्षित होती. मात्र, अनेक जिल्ह्यांमध्ये मानवी हस्तक्षेप आणि अनियंत्रित पाणी उपशामुळे पाणी पातळी झपाट्याने खालावत आहे. याचा परिणाम गावागावांतील पिण्याच्या पाण्याचे स्रोत बंद पडून सर्वसामान्य नागरिकांवर घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
सर्वाधिक छत्रपती सभाजीनगर जिल्ह्याच्या विहिरींचे निरीक्षण
भूजल विभागाच्या वतीने मार्च अखेर प्रत्येक जिल्ह्यातील निरीक्षण विहिरींचे सर्वेक्षण केले असून, ८७५ विहिरींची नोंद घेतली आहे. यामध्ये सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १४१ विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ही नोंद भूजल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतली जाते. त्यानुसार भूजल पातळीचा अंदाज काढला जातो.
अनेक विहिरींचे अस्तित्व धोक्यात
जिल्ह्याची पाणीपातळी निश्चित करण्यासाठी भूजल विभागाकडून काही शासकीय, तर काही खासगी विहिरींचे सर्वेक्षण केले जाते. यातील बहुतांश गावांतील विहिरी गाळाने भरलेल्या आहेत, तर काही विहिरींमध्ये झुडपे उगवलेली आहेत. यामुळे भूजल विभागाचे निरीक्षण कितपत योग्य आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
०.६१ मीटरने पाणी पातळी अधिक
गतवर्षी मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. त्या तुलनेत भूजल पातळी सुधारणे अपेक्षित होते. मात्र, मार्चअखेर केलेल्या सर्वेक्षणात गत पाच वर्षांच्या तुलनेत केवळ ०.६१ मीटर पातळी अधिक दिसून आली आहे.
जिल्हानिहाय भूजल पातळी व विहिरी
जिल्हा - पाणी पातळी - निरीक्षण विहिरी
छ. संभाजीनगर - ९.४८ - १४१
जालना - ८.३९ - ११०
परभणी - ७.०८ -८६
हिंगोली - ७.९२ - ५५
नांदेड - ७.४३ - १३४
लातूर - ६.६६ -१०९
धाराशिव - ७.७३ - ११४
बीड - ७.०० -१२६
एकूण - ७.७१ - ८७५
पाण्याचा उपसा अधिक
मार्च महिन्यात भूजल विभागाने धाराशिव जिल्ह्यातील ११४ विहिरींचे निरीक्षण केले आहे. यामध्ये जिल्ह्याची पाणी पातळी ७.७३ मीटरवर असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. पाण्याचा उपसा अधिक होत असल्याने पातळी खालावत आहे.
-रवींद्र मांजरमकर, भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभाग, धाराशिव.