लेकीच्या लग्नाला उरले ८ दिवस; अक्षता पडण्यापूर्वीच वीज कोसळून बापाचा दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 11:35 IST2026-04-22T11:30:15+5:302026-04-22T11:35:01+5:30

लेकीच्या लग्नाची लगबग, पण विजांच्या कडकडाटाने होत्याचे नव्हते झाले; धाराशिवमधील कष्टकरी पित्याची प्राणज्योत मालवली.

Tragic: Farmer Dies of Lightning Strike Just 8 Days Before Daughter's Wedding in Dharashiv. | लेकीच्या लग्नाला उरले ८ दिवस; अक्षता पडण्यापूर्वीच वीज कोसळून बापाचा दुर्दैवी अंत

लेकीच्या लग्नाला उरले ८ दिवस; अक्षता पडण्यापूर्वीच वीज कोसळून बापाचा दुर्दैवी अंत

- जोतिराम काटे

समुद्रवणी (जि. धाराशिव): ज्या कष्टकरी हातांनी आपल्या एकुलत्या एक लेकीचे कन्यादान करायचे होते, त्याच पित्यावर नियतीने काळाचा घाला घातला आहे. तालुक्यातील विठ्ठलवाडी शिवारात मंगळवारी सायंकाळी कडब्याची गंज झाकत असताना वीज कोसळून बबन गोविंद लांडगे (५०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मुलीचे लग्न अवघ्या आठ दिवसांवर आले असताना घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मोबाईलवर गाणी सुरू होती अन् वीज पडली
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास परिसरात पावसाचे ढग दाटून आले होते. पावसापासून जनावरांचा चारा वाचवण्यासाठी बबन लांडगे हे कडब्याच्या गंजीवर ताडपत्री (तळवट) झाकत होते. यावेळी त्यांच्या खिशातील मोबाईलवर गाणी सुरू होती. अचानक विजांचा कडकडाट होऊन थेट लांडगे यांच्यावर वीज कोसळली. विजेचा प्रहार इतका भीषण होता की, त्यांच्या खिशातील मोबाईलचे अक्षरशः तुकडे झाले.

लग्नाघरात पसरली शांतता
लांडगे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली होती. मुलीच्या लग्नाची खरेदी आणि निमंत्रणे वाटण्याचे काम उत्साहात सुरू असतानाच हा दुर्दैवी प्रकार घडला. बबन लांडगे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. ज्या बापाने लेकीच्या सुखी संसाराची स्वप्ने पाहिली होती, त्यांच्याच निधनाने लांडगे कुटुंबावर आभाळ फाटले आहे.

Web Title : बेटी की शादी से पहले बिजली गिरने से पिता की मौत

Web Summary : किसान बबन लांडगे की बिजली गिरने से मौत हो गई, वह घास के ढेर को ढक रहे थे। उनकी बेटी की शादी बस आठ दिन दूर थी। इस दुखद घटना से गांव में मातम छा गया है और परिवार तबाह हो गया है।

Web Title : Father dies in lightning strike days before daughter's wedding.

Web Summary : Farmer Baban Landge died after being struck by lightning while covering haystacks. His daughter's wedding was just eight days away. The tragic incident has cast a pall of gloom over the village, leaving the family devastated.