धाराशिवच्या 'महाकाली कला केंद्रा'चा अखेर खेळ खलास, गोळीबार-राड्यानंतर प्रशासनाचे सील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 17:10 IST2026-04-15T17:05:04+5:302026-04-15T17:10:02+5:30

न्यायालयाने याचिका फेटाळताच जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; कळंब तहसीलदारांकडून महाकाली कला केंद्राला सील ठोकून गुंडाळले बिछाणे.

Dharashiv Administration Seals Controversial Mahakali Kala Kendra Following Frequent Violence | धाराशिवच्या 'महाकाली कला केंद्रा'चा अखेर खेळ खलास, गोळीबार-राड्यानंतर प्रशासनाचे सील 

धाराशिवच्या 'महाकाली कला केंद्रा'चा अखेर खेळ खलास, गोळीबार-राड्यानंतर प्रशासनाचे सील 

धाराशिव : गोळीबार, हाणामाऱ्या तसेच इतर वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत आलेल्या चोराखळी येथील महाकाली कला केंद्राला अखेर १४ एप्रिल रोजी प्रशासनाने सील ठोकले. न्यायालयाने आदेश देताच जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून कळंबच्या तहसीलदारांना तसे निर्देश दिले होते. पोलिसांच्या उपस्थितीत मुख्य प्रवेशद्वार तसेच आतील खोल्यांना टाळे ठोकून ते सीलबंद करण्यात आले.

सोलापूर-धुळे महामार्गावरील महाकाली कला केंद्र वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. यापूर्वी गोळीबार तसेच हाणामारीची प्रकरणे घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसा अहवाल पोलिस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार परवानगी नाकारल्यानंतरही विभागीय आयुक्त तसेच खंडपीठात कला केंद्र चालकाने याचिका दाखल केली होती. यातच दोन दिवसांपूर्वी या कला केंद्रावर मोठा राडा झाला. कोयते, तलवारी घेऊन टोळक्याने हल्ला चढवत ५ लाखांच्या ऐवजाची चोरी केली व ३ लाखांच्या ऐवजाचे नुकसान केल्याप्रकरणी येरमाळा ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. ही प्रकरणे लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, न्यायालयातून केंद्र चालकाने आपली याचिका मागे घेतल्यामुळे प्रशासनाला कारवाईचा मार्ग मोकळा झाला. न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी कला केंद्रास सील ठोकण्याचे आदेश काढले. त्यानुसार मंगळवारी सकाळीच कळंबचे तहसीलदार व येरमाळ्याचे सहायक पोलिस निरीक्षक यांच्या उपस्थितीत मुख्य प्रवेशद्वार व आतील खोल्यांना टाळे ठोकून ते सीलबंद करण्यात आले.

नेमके काय होते प्रकरण ?
कला केंद्र चालक राजाभाऊ माळी यांनी कला केंद्र चालू करण्यासाठी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी अर्ज केला होता. मात्र, त्या अर्जावर निर्णय होण्यापूर्वीच त्यांनी केंद्र सुरू केले. नंतरच्या काळात केंद्राच्या परिसरात दखलपात्र गुन्हे घडले. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही हे कला केंद्र सुरूच ठेवल्याने अखेर त्यास सील ठोकण्याचे आदेश १३ एप्रिलला काढण्यात आले व १४ एप्रिलला त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

पिंजरावरही टांगती तलवार
धाराशिव तालुक्यातील आळणी शिवारात असलेल्या पिंजरा कला केंद्रावरही टांगती तलवार आहे. परवाना न घेताच इमारतीचे बांधकाम, महामार्ग प्राधिकरणाची नाहरकत व अन्य आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने पिंजरा कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची कार्यवाही सुरू आहे. यासंदर्भात चालकांना नोटीस देऊन १६ एप्रिलच्या सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Web Title : हिंसा और विवाद के बाद धाराशिव का 'महाकाली कला केंद्र' सील

Web Summary : हिंसा और कानूनी लड़ाई के बाद, धाराशिव के महाकाली कला केंद्र को 14 अप्रैल को अधिकारियों ने सील कर दिया। यह कार्रवाई बार-बार होने वाली हिंसा और नियमों की अवहेलना के कारण अदालत के आदेश के बाद की गई। एक अन्य कला केंद्र, 'पिंजरा,' भी परमिट उल्लंघन के लिए इसी तरह की कार्रवाई का सामना कर रहा है।

Web Title : Dharashiv's 'Mahakali Kala Kendra' Sealed After Violence and Controversy

Web Summary : Following violence and legal battles, Dharashiv's Mahakali Kala Kendra was sealed by authorities on April 14th. The action followed a court order prompted by repeated incidents of violence and disregard for regulations. Another Kala Kendra, 'Pinjara,' faces similar action for permit violations.